धनगर समाजाला एसटी आरक्षण दिले नाही, ४ तारखेला गोदावरी नदी पात्रात उडी घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:55 IST2025-10-01T18:54:54+5:302025-10-01T18:55:12+5:30
धनगर आंदोलक बळीराम खटके यांचा सरकारला इशारा!

धनगर समाजाला एसटी आरक्षण दिले नाही, ४ तारखेला गोदावरी नदी पात्रात उडी घेणार
पवन पवार,वडीगोद्री- येत्या ४ तारखे पर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी आरक्षण दिले नाही, तर हा बळीराम खटके चार तारखेला संध्याकाळी चार वाजता गोदावरी नदी पात्रात उडी घेणार, असा इशारा बुधवारी वडीगोद्री येथील धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको दरम्यान धनगर आंदोलक बळीराम खटके यांनी सरकारला दिला आहे.
सरकारला मला आत टाकायचं टाकू द्या, माझ्यावर गुन्हा दाखल होऊ द्या. आमचा एक बांधव तिकडे उपोषणाला बसला आहे, तो स्वतःच्या जीवाची परवा करत नाही. जर सरकारला आंदोलनाची भाषा करत असेल तर सरकारला आंदोलनाने उत्तर देणार. जर सरकारला आमचा जीवच घ्यायचा असेल येणाऱ्या चार तारखेला चार वाजता धनगर समाजाचा एक बळी गेलेला तुम्हाला नक्की दिसेल. मंग जर तुमच्या आमदार खासदाराला काही झालं महाराष्ट्रात जर तांडव निर्माण झाला तर याला सरकार जबाबदार असेल. येणाऱ्या आठ दिवसात जर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, तर एकाही आमदार व मंत्र्यांना फिरू द्यायच नाही, असेही बळीराम खटके म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली धनगर शिष्टमंडळाची जी बैठक झाली, त्या बैठकीला काल मी पण होतो. पण त्या बैठकीत धनगर समाजाच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम या सरकारने केले आहे. आम्ही देवेंद्र फडवणीस यांना सांगितले की, २०१४ ला जो वादा केला होता, पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षण देऊ, अकरा वर्षात तुमचा धनगर आरक्षणाबाबत अभ्यास झाला नाही का ? त्यामुळे या सरकारचा मला जाहीर निषेध करायचा आहे.
तुमच्या आमच्या मतावर निवडून यायचं, सत्ता भोगायची नंतर धनगराच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम कोणी केले असेल तर या महायुती सरकारने केले आहे. ७० वर्षापासून धनगर समाज बांधवांनी हा एसटी आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे. आमचा हा लढा काय दोन-चार वर्षांपूर्वी चालू झालेला नाही. मला देवेंद्र फडणवस साहेबांना हे सांगायचे की ७० वर्षापासून चालू असलेला लढा असताना तुम्ही फक्त आश्वासन देता. आता हा धनगर समाज दूध खुळा राहिला नाही. आम्ही दोन्ही सरकार पाहिले महाविकास आघाडी पाहिलं आणि महायुती सरकारही पाहिलं, आमचं कोणीही नाही. धनगर शांत आहेत पण संत नाही.
माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, तुम्ही आम्हाला बापू वीरू विटेगावकर होऊ देऊ नका. वेळ आली तर आम्हाला हातात कुऱ्हाड घ्यावी लागेल. दीपक बोराडे यांच्या तब्येतीला काय झालं तर या महाराष्ट्रात तांडव माजल असा इशारा धनगर आंदोलक बळीराम खटके यांनी दिला आहे.