दवाखाना जाळून टाकीन! रुग्णाचा मृत्यू होताच नातेवाईकांचा डॉक्टरवर हल्ला
By दिपक ढोले | Updated: October 4, 2023 19:21 IST2023-10-04T19:21:37+5:302023-10-04T19:21:54+5:30
मयत रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्टरला सलाईनच्या स्टँडने मारहाण करण्याचा प्रयत्न

दवाखाना जाळून टाकीन! रुग्णाचा मृत्यू होताच नातेवाईकांचा डॉक्टरवर हल्ला
जालना : रुग्ण मयत झाला म्हणून दोन महिलांनी एका डॉक्टरला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना जालना शहरातील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
२ ऑक्टोबर रोजी एका रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्या रुग्णाचा मृत्यू झाला. संतप्त झालेल्या दोन महिलांनी तेथे उपस्थित असलेले डॉ. राजू जाधव यांना सलाईनच्या स्टँडने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी काही नर्स व रुग्णवाहिकांवरील चालकांनी त्या महिलांना समज दिली. परंतु, त्या महिलांनी ‘माझी आई जशी होती, तशी करून दे.. तोपर्यंत मी तुला सोडणार नाही,’ असे म्हणून शिवीगाळ करीत ‘दवाखाना जाळून टाकीन,’ अशी धमकीही दिली.
या प्रकरणी अपघात विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू शेषराव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जालना शहरातील कन्हैयानगर भागातील दोन महिलांविरुद्ध कदीम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार रामेश्वर पिराने हे करीत आहेत.