'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:38 IST2025-09-10T14:36:22+5:302025-09-10T14:38:23+5:30
दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेणार! नारायणगडावर येण्याचे जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन

'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
- पवन पवार
वडीगोद्री (जालना): मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचे कौतुक करतानाच, धोका दिल्यास सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. विखे पाटील चांगले काम करत आहेत आणि मराठ्यांच्या हितासाठी जो मंत्री झटून काम करेल, त्याच्यासाठी मराठा समाज कायम उभा राहील, असेही ते म्हणाले.
आज होणाऱ्या मराठा उपसमितीच्या बैठकीबद्दल माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. "एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब चांगले काम करत आहेत. पण, आम्हाला धोका दिल्यास आम्ही सोडणार नाही, हे तितकेच खरे आहे," असे ते म्हणाले.
मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या
जरांगे पाटील म्हणाले की, मराठवाड्यातील सर्व मराठा कुणबी आहेत. त्यामुळे सर्वांना कुणबी प्रमाणपत्रे मिळाली पाहिजेत. "तुम्ही फक्त प्रक्रिया सुरू करा, आम्हाला काही अडचण नाही. हैदराबाद गॅझेटिअर स्पष्ट सांगते की, मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे. एकदा प्रमाणपत्रे येणे सुरू झाली की ती अखंडितपणे सुरूच ठेवा, मध्येच थांबू नका," अशी मागणी त्यांनी केली. विखे पाटील यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत ते म्हणाले की, विखे पाटील यांचा समाज नक्कीच आभारी राहील, पण एकही मराठा सुटता कामा नये.
भुजबळांवर जोरदार टीका
जरांगे पाटील यांनी ओबीसी उपसमितीच्या बैठकीवर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. "ती उपसमिती जातीवाद करण्यासाठी नसावी अशी आमची अपेक्षा आहे. ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मराठ्यांचा एकही मंत्री नाही, हे विचार करण्यासारखे आहे. सरकारने यावर लक्ष द्यावे," असे ते म्हणाले. भुजबळ सरकार आणि मराठा समाजात वितुष्ट निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. "येवल्यावाला नासक आहे, जर माझ्या नादी लागला तर त्याचा सर्व देवारा उठवीन," अशा कठोर शब्दांत त्यांनी भुजबळ यांना आव्हान दिले.
मराठवाड्यातील मराठ्यांचे कल्याण होईल
जीआरमध्ये बदल केल्यास महाराष्ट्र पुन्हा उसळेल, असा इशारा देताना जरांगे पाटील म्हणाले, "जीआरला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नका. सरकारनेच काही लोकांकडून जीआरबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. जर जीआरमध्ये काही चूक झाली असेल, तर तो सुधारित करून मराठवाड्यातील मराठ्यांचे कल्याण होईल."
नारायणगडावर ताकदीने या
पुढे बोलताना त्यांनी मराठा समाजाला नारायणगडावरील दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्याचे आवाहन केले. "आम्ही दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेणार आहोत. नारायणगडावर मराठेच मराठे दिसले पाहिजेत, ताकदीने या," असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.