हे कसे झाले ! सासरी जाताना तीन नववधू ऐेवजासह पसार; गुजरातच्या तिघांना चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 12:28 IST2021-01-13T12:23:45+5:302021-01-13T12:28:41+5:30
three brides runs with cash याप्रकरणी गुजरात येथील पीयूष शांतीलाल यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे कसे झाले ! सासरी जाताना तीन नववधू ऐेवजासह पसार; गुजरातच्या तिघांना चुना
- दीपक ढोले
जालना : मुलींचे प्रमाण कमी झाल्याने बहुतांश तरुणांना वधू मिळणे कठीण झाले आहे. वधू मिळण्यासाठी वर कितीही पैसे मोजण्यासाठी तयार असतात. त्यातून त्यांची फसवणूक झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. अशीच फसवणूक गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील तीन तरुणांची झाली.
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील तीन मुलींनी वकिलाकडून बाँड करून या तीन तरुणांशी ७ जानेवारी रोजी कायदेशीर लग्न केले. त्यानंतर ८ जानेवारीला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तीन वर, तीन वधू व अन्य एक व्यक्ती एका कारने गुजरातकडे निघाले. जालना शहराजवळील नागेवाडी येथे आल्यावर मुलींनी लघुशंकेचे निमित्त करत गाडी थांबयाला लावली. त्यानंतर या तीनही मुली तीन मोबाइल, रोख रक्कम ३० हजार असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झाल्या.
याप्रकरणी गुजरात येथील पीयूष शांतीलाल यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुजरात येथील पीयूष शांतीलाल वसंत (रा. जुनागड) यांच्या तीन मित्रांचे लग्न जमत नव्हते. त्यांनी वसंत यांना मुलगी पाहण्यास सांगितले. जालना येथील मित्र पाशाभाई (पूर्ण नाव माहीत नाही) याला फोन करून मुलींबाबत विचारणा केली. त्याने वसंत यांना २ जानेवारी रोजी जालना येथे बोलावून घेतले. त्यानंतर तीन मुलांसह ते देऊळगाव येथे गेले. तेथील एका महिलेने तीन मुली दाखविल्या. तरुणांनी लग्न करण्यास होकार दिला. त्यानंतर पीयूष वसंत हे आपल्या मित्रांसोबत जालना शहरातील एका हॉटेलवर थांबले. लग्नासाठी खरेदी केली. ७ रोजी वकिलाकडून बाँड करून तिन्ही मुलींशी कायदेशीर लग्न केले.
आम्ही आईकडे जाऊन येतो, असे म्हणून मुली देऊळगावराजा येथे निघून गेल्या. ८ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्या परत आल्या. त्यानंतर तीन मुली, अन्य एका व्यक्तीसह वाहनाने गुजरातकडे निघाल्या. जालना- औरंगाबाद रोडवरील नागेवाडी येथे आल्यावर मुलींनी लघुशंकेचे निमित्त करत गाडी थांबवायला लावली. अंधाराचा फायदा घेऊन मुली फरार झाल्या. पीयूष वसंत यांनी संबंधित महिलेला फोन करून मुली पळून गेल्याचे सांगितले असता, तिने त्यांनाच धमकी दिली. तुम्ही पळून जा, नाही तर तुम्हाला बघून घेईन, असे ती म्हणाली.
महिलेकडून धमकी मिळताच वरही पसार
अंधाराचा फायदा घेऊन मुली फरार झाल्यानंतर पीयूष वसंत यांनी संबंधित महिलेला फोन करून मुली पळून गेल्याचे सांगितले असता, त्या महिलेने त्यांनाच धमकी दिली. तुम्ही पळून जा, नाही तर तुम्हाला बघून घेईन, असे ती म्हणाली. यानंतर हे कसे झाले असा विचार करत तिन्ही वर घाबरून गुजरातला पळून गेले.
गुजरात येथील तीन तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून फसवले आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आरोपींचा शोध घेत असून, त्यांना तातडीने अटक करू. -श्यामसुंदर कौठाले, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, चंदनझिरा.