गरजला अन्... बरसलाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:38 IST2019-07-03T00:38:13+5:302019-07-03T00:38:13+5:30
गेल्या चार महिन्यांपासून प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या जालनेकरांना मंगळवारी झालेल्या धुवाधार पावसाने दिलासा दिला आहे.

गरजला अन्... बरसलाही...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या चार महिन्यांपासून प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या जालनेकरांना मंगळवारी झालेल्या धुवाधार पावसाने दिलासा दिला आहे. दुपारी तीन तास हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने शहरात उत्साह निर्माण झाला होता. दरम्यान कुंडलिका नदीवर बांधण्यात आलेले दोन्ही बंधारे भरभरून वाहिल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
जालना जिल्ह्याचा विचार करता, मागील वर्षी केवळ ६१ टक्के एवढा कमी पाऊस झाला होता. त्याचा परिणाम तीव्र दुष्काळासह पाणीटंचाईवर जाणवला. कधी नव्हे तेवढे ७०० पेक्षा अधिक टँकर जिल्ह्यात लावावे लागले. त्यामुळे यंदा सर्वांच्या नजरा या पावसाकडे होत्या. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थोडा-बहूत पाऊस पडल्याने आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु नंतर पुन्हा पावसाने उघडीप दिल्याने चिंता वाढली होती.
मंगळवारी किमान जालना शहर व परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली.कधी मध्यम तर कधी हलक्या सरींनी जालनेकरांना चिंब केले. विशेष म्हणजे या पहिल्याच झालेल्या जोरदार पावसात कुंडलिका नदीवर बांधालेला बंधारा भरून वाहिला. त्यामुळे नदीलाही पूर आला होता. एकूणच या पावसामुळे आता जालना तालुक्यात पेरण्यांना वेग येणार यात शंका नाही.
जालना शहरातील सखल भागात पाणी साचल्याने अनेक रिक्षा, दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये पाणी गेल्याने अनेकांना त्या ढकलत न्याव्या लागल्या. तर जुना जालना भागातील टाऊन हॉल येथील मुख्य चौकात असलेल्या नालीवर ढापा नसल्याने एक कार त्यात पडल्याने अडकून पडली होती. दरम्यान समस्त महाजन ट्रस्टने चंदनझिरा, दावलवाडी परिसरातील नाला रूंदीकरण केल्याने तेथेही मोठे पाणी साठले आहे.
बच्चे कंपनी होती भिजण्यात मग्न
ऐन शाळा सुटण्याच्या वेळेस पाऊस सुरू होता. त्यामुळे बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा आंनद घेतल्याचे दिसून आले.
अनेकांकडे छत्री असतानाही विद्यार्थ्यांनी ती उघडली नसल्याचे दिसून आले. शाळेच्या मैदानासह रस्त्यावरही बच्चे कंपनीने भिजण्याचा आनंद लुटला.
जालना शहरात घरात, दुकानात घुसले पाणी
जालना शहरात मंगळवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये घरामध्ये पाणी शिरले होते. हे पाणी काढताना नागरिकांची चांगलीच दमछाक झाली.
एकूणच नाल्यांवरील वाढलेली अतिक्रमणे यामुळे नाल्यांची रूंदी कमी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून घरात पाणी शिरत आहे.