आमच्यामुळे नाही तर तीनही पक्षांतील महत्त्वाकांक्षी लोकांमुळेच सरकार कोसळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 18:18 IST2020-02-22T18:17:21+5:302020-02-22T18:18:30+5:30
त्यांच्यातील लाथाळ्यांनी सरकार पडेल - दानवे

आमच्यामुळे नाही तर तीनही पक्षांतील महत्त्वाकांक्षी लोकांमुळेच सरकार कोसळेल
जालना : राज्य सरकार आमच्या सरकारच्या काळातील अनेक कल्याणकारी योजनांना स्थगिती देत आहे, ही बाब चांगली नाही, सरकार पाडण्यासाठी आमचे कुठलेच प्रयत्न सुरू नसून, हे सरकार या तीन पक्षांतील महत्त्वाकांक्षी लोकांमुळेच कोसळेल असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.
दानवे म्हणाले, महापोर्टल असो की, जलयुक्त शिवार अशा अनेक योजनांना निधी देणे बंद करून त्या चुकीच्या असल्याचा डांगोरा सरकार पिटत आहे. नुसत्या जालना जिल्ह्यामधील सुमारे ५५ कोटी रूपयांपेक्षा अधिक योजनांना स्थगिती दिल्याचे त्यांनी सांगितले. आपण केंद्रातून जालन्याच्या विकासासाठी निधी आणणार आहोत. असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेवर टीका
एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी बंगळुरु येथे दोन दिवसांपूर्वी शंभर कोटींना १५ कोटी भारी असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य चुकीचे असून, आपण त्याचा निषेधच करतो. शिवसेनेने याबद्दल अधिक भूमिका घेणे अपेक्षित होते; परंतु आता शिवसेनेची स्थिती ही शेपूट तुटलेल्या वाघासारखी असल्याचा टोलाही दानवे यांनी लगावला.