'येणाऱ्या खरीप हंगामापूर्वी मदत द्या', दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची केंद्रीय पथकाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 19:36 IST2023-12-13T19:36:27+5:302023-12-13T19:36:52+5:30
तीन तासांत पाच गावांतील पिकांची पाहणी करून केंद्रीय पथक परतले

'येणाऱ्या खरीप हंगामापूर्वी मदत द्या', दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची केंद्रीय पथकाकडे मागणी
- फकिरा देशमुख
भोकरदन ( जालना) : भोकरदन तालुक्यात खरीप हंगामात पडलेल्या दुष्काळी परिस्थिती आढावा व पिकांची पाहणी आज दुपारी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या दोन सदस्यीय पथकाने केली. केवळ तीन तासात पाच गावातील दुष्काळी परिस्थिती, पिकांची पाहणीचा पंचनामा करून पथक परतले. येणाऱ्या खरीप हंगापूर्वी मदत द्यावी अशी मागणी यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी पथकाकडे केली.
कृषी मंत्रालयातील ए. एल. वाघमारे आणि हरीश उंबरजे यांच्या पथकाने सुरवातीला दानापूर येथील कोरड्या पडलेल्या जुई मध्यम प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर पंढरपूरवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब वाघ यांच्या शेतावर जाऊन पथकाने कापूस लागवड , त्यासाठी आलेला खर्च आणि उत्पादन याची माहिती घेतली. दिड एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या क्षेत्रातून केवळ एक क्विंटल कापसाचे उत्पादन निघाले, अशी माहिती शेतकरी वाघ यांनी दिली. त्यानंतर हसनाबाद, फुलेंनगर, येथील कापूस पिकाची तर पिप्री येथे मका व सोयाबीन पिकाची पाहणी पथकाने केली. सर्व ठिकाणी पंचनामे करून हे पथक सायंकाळी साडेपाच वाजता परतले.
पथकसोबत सोबत अप्पर जिल्हाधिकारी रिना मैत्रावार, जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार संतोष बनकर, व्ही डी गायकवाड, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, गटविकास अधिकारी गजानन सुरडकर,शेतकरी केशव जंजाळ, दत्ता पवार, रामराव दळवी, भाऊसाहेब वाघ, अनिल शिंदे, संजय पांडे, लखन पवार आदींची उपस्थिती होती.
गाळ काढण्यास मदत करावी
केशव जंजाळ या शेतकऱ्याने पथकाला दानापूर येथील जुई धरणातील गाळ काढणे व तो शेतात नेऊन टाकण्यासाठी शासनाने मदत करावी. तसेच सध्या निर्माण झालेल्या पाणी टंचाईसाठी तात्काळ टॅंकर मंजूर करावे, जनावरांच्या पाण्याचा सुद्धा विचार करावा, दुष्काळी मदत तात्काळ द्यावी अशी मागणी केली.