घरकुलचा हप्ता हवा, ५ हजारांची लाच द्या; कंत्राटी कनिष्ट अभियंत्यास कार्यालयातच रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:04 IST2025-02-28T16:04:02+5:302025-02-28T16:04:09+5:30
भोकरदन पंचायत समितीच्या कार्यालयातच एसीबीने केली कारवाई

घरकुलचा हप्ता हवा, ५ हजारांची लाच द्या; कंत्राटी कनिष्ट अभियंत्यास कार्यालयातच रंगेहाथ पकडले
- फकिरा देशमुख
भोकरदन: घरकुलचा दुसरा हप्ता देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भोकरदन पंचायत समितीच्या कंत्राटी कनिष्ट अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज सकाळी पंचायत समितीच्या कार्यालयात एसीबी पथकाने केली. येथील पंचायत समितीमध्ये घरकुलचा पहिला, दुसरा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक करण्यात येत होती. त्यामुळे लाभार्थी वैतागले आहेत. कंत्राटी कनिष्ट अभियंता लाचेच्या जाळ्यात अडकल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
तालुक्यातील शेलुद येथील एका लाभार्थ्यांला घरकुल मंजूर झालेले होते. बांधकाम करण्यासाठी पहिला हप्ता देण्यात देण्यात आला होता, मात्र दुसरा हप्ता मिळावा यासाठी संबधीत लाभार्थी पंचायत समितीचे कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता प्रदीप रंगनाथ राठोड यांच्याकडे वारंवार विनंती करत होता. यावेळी राठोड याने दुसरा हप्ता पाहिजे असल्यास 20 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर 5 हजार रुपयांमध्ये तडजोड झाली. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने लाभार्थ्याने जालना येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे धाव घेतली. विभागाने लाचेची मागणी केल्याची पडताळणी करून पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला. आज सकाळी राठोड याने तक्रारदारांकडून 5 हजारांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
घराची झडती होणार
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळू जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे, कर्मचारी, श्रीनिवास गुडूर, अमोल चेके, शिवा खुळे, बिनोकर यांनी केली. राठोड यास पथकाने अटक केली असून त्याच्या घराची झडती घेण्यासाठी पथक कंडारी ( तालुका बदनापूर ) येथे गेल्याचे सांगण्यात आले आहे.