संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:32+5:302021-09-06T04:34:32+5:30
जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव, हातची गेलेली नोकरी यासह इतर अनेक कारणांनी अनेकांच्या मनावरील ताण वाढत आहे. या ताणतणावात कुटुंबातील ...

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य
जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव, हातची गेलेली नोकरी यासह इतर अनेक कारणांनी अनेकांच्या मनावरील ताण वाढत आहे. या ताणतणावात कुटुंबातील सदस्य, मित्रांसमवेत असलेली संवादाची दरी वाढली तर आपल्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. अशाच संवादाच्या दरीतून मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद झाल्या. अनेक कंपन्यांनी मनुष्यबळामध्ये कपात केली. या कपातीच्या कात्रीत सापडलेल्या अनेक युवकांमध्ये नैराश्य आलेले आहे. अनेकांना काम मिळाले तर अनेकांच्या हाताला अद्याप काम नाही. अनेकजण शेतात कामाला जात आहेत. कोरोनामुळे बदललेल्या जीवन शैलीत अनेकांचा मानसिक तणाव वाढला आहे. या ताणतणावात कुटुंबातील सदस्य असोत किंवा मित्र असोत यांच्यामधील संवादाची दरी वाढू लागली आहे. संवाद कमी झाल्याने अनेकजण मानसिक आजाराने त्रस्त होत आहेत. शिवाय आत्महत्येसारखे विचारही अनेकांच्या मनात घर करण्याची भीती असते. त्यामुळे अशा घटना थांबविण्यासाठी एकमेकांमध्ये निर्माण झालेली संवादाची दरी दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मन हलके करणे हाच उपाय
मनातील नकारात्मक विचार दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा.
सकस आहार घेण्यासह नियमित व्यायाम करावा.
रात्रीच्या वेळी पुरेशी झोप घ्यावी
रागावर नियंत्रण ठेवावे
अडचणींवर मात करण्यासाठी इतरांशी चर्चा करावी
मानसोपचार तज्ज्ञ म्हणातात...
मागील काही दिवसांपासून मानसिक आजारांनी त्रस्त असल्याने उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मानसिक आजारातून रुग्णाला बाहेर काढण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनीच पुढाकार घेऊन वेळोवेळी योग्य संवाद साधणे गरजेचे आहे. एकमेकांशी सुयोग्य संवाद साधला तर मानसिक आजार दूर होण्यास मदत होते.
डॉ. नितीन पवार
मानसिक आजार जडण्याची विविध कारणे आहेत. अनेकजण छोट्या-छोट्या गोष्टींमुळे तणावात जातात. अशा व्यक्तींची मानसिकता ओळखून वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे. पती-पत्नी, पालक-मुलांमधील संवादही यात महत्त्वाचा आहे. समोरील व्यक्तीची मानसिकता ओळखून त्यांचे मन परिवर्तन करून मानसिक आजारातून बाहेर काढता येते. शिवाय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणेही महत्त्वाचे आहे.
डॉ. संदीप लहाने