धामना नदीजवळील शेतात चार दिवसाचे अर्भक आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 19:13 IST2019-08-06T19:08:53+5:302019-08-06T19:13:38+5:30
सोयाबीनच्या शेतात मंगळवारी पहाटे आढळून आले

धामना नदीजवळील शेतात चार दिवसाचे अर्भक आढळले
जाफराबाद (जालना ) : तालुक्यातील पिंपळखुटा येथे धामना नदीच्या पूलाजवळील सोयाबीनच्या शेतात मंगळवारी पहाटे चार दिवसांचे जिवंत स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. यावर जाफराबाद ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालय (जालना) येथे अर्भकास दाखल केले आहे.
जाफराबाद- चिखली मार्गालगत तीन किमी. अंतरावर पिंपळखुटा गावाजवळ प्रकाश दूनगहू यांचे शेत आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजता प्रा. निवृत्ती बनसोडे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पंडित, उत्तम उगले, राधेश्याम घोरपडे, रामभाऊ शिराळे, उत्तम दूनगहू, विलास खंबाट हे मॉर्निंग वॉकला गेले होते. दरम्यान दूनगहू यांच्या सोयाबीनच्या शेतालगत लहान बाळ रडत असल्याचा आवाज मॉर्निंग वॉकला गेलेल्या काही नागरिकांना आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तिथे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती देवून अर्भकास जाफराबाद ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले.
त्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पुरी, डॉ. कदम, कृष्णा वानखेडे, रीना सोळंके यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पोलिसांच्या ताब्यात देऊन या मुलीस जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे दाखल करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात मातेविरूद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात मातेचा शोध घेत असल्याची माहिती पोनि. शिरीष हुंबे यांनी दिली