दर्दी प्रेक्षक दुरावल्याने लोककला तमाशा मोजतेय अंतिम घटका, राज्यात केवळ ७ फड जिवंत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:46 IST2025-11-06T12:45:01+5:302025-11-06T12:46:01+5:30
शतकाची परंपरा असलेल्या आनंद लोकनाट्य मंडळाचे हेमंतकुमार महाजन यांनी व्यक्त केली चिंता

दर्दी प्रेक्षक दुरावल्याने लोककला तमाशा मोजतेय अंतिम घटका, राज्यात केवळ ७ फड जिवंत!
टेंभुर्णी (जि. जालना) : एकेकाळी जिवंत लोककला सादर करून ग्रामीण प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी तमाशा लोककला ही अंतिम घटिका मोजू लागली आहे. महाराष्ट्रातील १७ लोकनाट्य तमाशा मंडळापैकी आता केवळ ७ तमाशा मंडळे तेवढी उरली आहेत. तमाशाचा दर्दी प्रेक्षक दुरावल्याने तमाशावर ही दुर्दैवी वेळ आली आहे. त्यातच पाऊस आणि वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीचाही तमाशांना मोठा संघर्षमय सामना करावा लागत आहे.
भविष्यात शासनाने तमाशाच्या संगोपन आणि संवर्धनासाठी मोठी पावले उचलली नाही तर उरलीसुरली ही मंडळीही नामशेष होण्यास वेळ लागणार नाही, अशी चिंता आनंद लोकनाट्य तमाशा मंडळाचे मालक हेमंत कुमार महाजन यांनी व्यक्त केली. सोमवारी टेंभुर्णी (जि. जालना) येथील आठवडी बाजारात प्रयोगासाठी आले असता, त्यांनी लोकमतशी बातचीत केली.
एकेकाळी राजाश्रय मिळालेली तमाशा ही जिवंत लोककला टीव्ही आणि मोबाईलच्या युगात टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागासमोर आहे. ग्रामीण भागात सिनेमापेक्षाही तमाशाचा मोठा प्रेक्षक वर्ग होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात घराघरांत टीव्ही आणि प्रत्येक हातात मोबाइल आल्याने ग्रामीण प्रेक्षकांनी सिनेमासह तमाशाकडेही पाठ फिरवली. ग्रामीण यात्रेची शान असलेले फिरते सिनेमागृह यात्रेतून केव्हाचेच हद्दपार झाले आहे. मात्र, तमाशाचे फड जिवंत ठेवण्यासाठी आजही काही तमाशा मालक व तमाशा कलावंत आटापिटा करीत आहे. दरम्यान, शासनाने ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी तमाशा फडांना उभारी देण्याची गरज आहे. नसता उरलीसुरली तमाशाचे मंडळे इतिहास जमा होण्यास वेळ लागणार नाही.
सर्वात जुने तमाशा मंडळ
माझे पणजोबा आनंदराव महाजन यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू केलेले आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ हे शंभर वर्षांची दीर्घ परंपरा असलेले महाराष्ट्रातील सर्वात जुने लोकनाट्य मंडळ आहे. आमच्या प्रत्येक पिढीने ही लोककला जपण्याचा जिवापाड प्रयत्न केला आहे. मात्र आता दुरावलेला दर्दी प्रेक्षक, नैसर्गिक आपत्तीचा सामना, स्थानिक प्रशासनाकडून केली जाणारी आर्थिक पिळवणूक, तमाशा उतरविण्यासाठी जागेचा प्रश्न आदी समस्यांमुळे ही लोककला संकटात सापडली आहे. कलावंत आणि कामगारांसह जवळपास ७० जणांचे हे कुटुंब पोसावे कसे हा प्रश्न आहे.
- हेमंतकुमार महाजन, मालक.
अक्षरशः उपासमारीची वेळ
मी ४० वर्षांपासून तमाशा कलावंत म्हणून सेवा देत आहे. आता वयाची साठी पार केली असताना अन्य व्यवसाय करू शकत नाही. कितीही प्रयत्न करून तीन-चारशेच्या वर तिकीट कटत नाही. त्यातच प्रत्येक गावात फुकट्या प्रेक्षकांची वाढती संख्या घेत खेदजनक आहे. एक महिन्यापासून आम्ही प्रयोगासाठी बाहेर पडलो आहे. त्यातील १२ दिवस अवकाळी पावसामुळे प्रयोग झाले नाही. अशावेळी आम्हा कलावंतावर अक्षरशः उपासमारीची वेळ येते. शासनाने सर्व तमाशा कलावंतांना सरसकट मानधन सुरू करावे.
- दिलीप सोनार, तमाशा कलावंत.
विशेष पॅकेज देण्यात यावे
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात तमाशाच्या संवर्धनासाठी एका तमाशा फडाला दर तीन वर्षांनी शासनातर्फे आठ लाखांचे विशेष पॅकेज दिले जायचे. त्यातून तमाशा कलावंत व फडाला पडतीच्या काळात उभारी मिळायची. मात्र, मागील काही वर्षांपासून हे विशेष पॅकेजही तमाशांना मिळत नाही, अशी खंतही यावेळी हेमंतकुमार महाजन यांनी बोलून दाखवली.