कौशल्याधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करा - प्रा. सुरेश लाहोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST2021-02-12T04:29:00+5:302021-02-12T04:29:00+5:30
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक प्रदीप भावठाणकर होते. व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती पाटील, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष ...

कौशल्याधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करा - प्रा. सुरेश लाहोटी
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक प्रदीप भावठाणकर होते. व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती पाटील, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नीलेश देशपांडे, सचिव अनिल लोखंडे व माता-पालक संघाच्या सदस्या वृषाली आचार्य या होत्या. प्रशालेतर्फे सर्व मान्यवरांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व जालना एज्युकेशन सोसायटीच्या कार्याची ओळख शिक्षिका नीता धिवाळ यानी करून दिली. पालक मेळावा आणि त्याची गरज यावेळी विशद करण्यात आली. प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक प्रदीप भावठाणकर आपल्या मनोगतात म्हणाले की, कोणत्याही समस्येचे निदान करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य केले पाहिजे. कोरोनाच्या काळात सर्वात जास्त नुकसान विद्यार्थ्यांचे झाले आहे. शिक्षणाची पद्धतच बदलली असल्याचे ते म्हणाले. पुढे बोलताना लाहोटी म्हणाले, "सृजनशीलता जोपासण्याकरिता वाचन संस्कृतीचा विकास केला पाहिजे. कौशल्याधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करून पालकांनी विद्यार्थ्यांना विविधप्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. पायाभूत शिक्षणावर प्राथमिक अवस्थेतच लक्ष दिले पाहिजे. सरस्वती भुवन प्रशाला, जालनाने हे नवीन आव्हान स्वीकारले आहे. नवीन अद्ययावत शिक्षण प्रणाली अद्ययावत केली आहे. पहिलीपासूनच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणारे शिक्षण कोरोनानंतर प्रशालेत सुरू केले आहे. येथील प्रत्येक विद्यार्थी सुसंस्कृत, संस्कारमय तर बनेलच तसेच स्पर्धेच्या युगात प्रत्येक आव्हान सहज पेलणारा बनेल. म्हणून कौशल्याधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांना इंग्रजीतून बोलता यावे, यासाठी प्रशालेने इंग्रजी भाषा विकास प्रकल्प कसा राबवला व आता राबविण्यात येत आहे, याची इंग्रजीचे शिक्षक रत्नाकर लांडगे यांची सविस्तर माहिती दिली. संगीतशिक्षक दिनेश संन्याशी यांनी मुलांकडून अभ्यास कसा करून घ्यावा याचे तंत्र सांगितले. जयमाला सिंधखेडकर यांनी सूत्रसंचालन केले, तर काथार यांनी आभार मानले.