जालन्यात गल्हाटी-मांगणी नदीला पूर; तर दुसरीकडे दुधना नदीपात्रात जलसमाधी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 13:33 IST2025-09-22T13:32:43+5:302025-09-22T13:33:19+5:30
नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उध्वस्त झाला आहे.

जालन्यात गल्हाटी-मांगणी नदीला पूर; तर दुसरीकडे दुधना नदीपात्रात जलसमाधी आंदोलन
जालना : जालना जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अनेक भागात नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. वडीगोद्री मंडळात दोन दिवसांच्या उघडीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शहापूर येथील गल्हाटी नदी आणि नालेवाडी येथील मांगणी नदीला पूर आला. यामुळे नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उध्वस्त झाला आहे.
गल्हाटी नदीला आलेल्या पुरामुळे जुने पिठोरी सिरसगावात १२ ते १५ घरांत पाणी शिरले. कपडे, धान्य व अन्य साहित्य भिजून नागरिकांचे नुकसान झाले. नालेवाडी येथील झोपडपट्टीतही पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघडे पडले आहेत. मांगणी नदीला पूर आल्याने नालेवाडी परिसरातील रेणापुरी, चंदनापुरी, दह्याळा, भांबेरी, चौंधाळा, विहमांडवा यांचे रस्ते रविवारी रात्रीपासून बंद झाले आहेत.
दरम्यान, अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथेही गल्हाटी नदीला आलेल्या पुरामुळे गावातील दुकान व हॉटेलमध्ये पाणी शिरले. नागरिकांची धावपळ उडाल्याने जिल्हा परिषद शाळा व मत्स्योदरी विद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली. “पुराच्या पाण्यात कोणीही नदीपात्र किंवा पुलावरून जाऊ नये, सर्वांनी सतर्क राहावे,” असा इशारा सरपंच वंदना काळे यांनी दिला आहे.
या अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर रांजणी परिसरातील शेतकरी सरकारविरोधात आक्रोश करत आहेत. अतिवृष्टी नुकसान अनुदानात रांजणीसह चार मंडळांचा समावेश न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी दुधना नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. विठ्ठल देशमुख, गौतम देशमुख, नानाभाऊ उगले, अमोल देशमुख, धनंजय देशमुख, सतीश महाराज जाधव, भगवान इंगळे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले. पीकहानी झाल्यानंतरही अनुदानापासून वंचित ठेवले गेल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे.