लाखाचे एक कोटी करून देतो म्हणत साडेपाच लाखांचा चुना; जादूटोण्याचे प्रयोग करणारा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:52 IST2025-06-19T13:50:27+5:302025-06-19T13:52:02+5:30

जादूटोण्याच्या साहित्यासह एक लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त

Five and a half lakhs of lime, claiming to make one crore of a lakh; Man arrested for practicing witchcraft | लाखाचे एक कोटी करून देतो म्हणत साडेपाच लाखांचा चुना; जादूटोण्याचे प्रयोग करणारा जेरबंद

लाखाचे एक कोटी करून देतो म्हणत साडेपाच लाखांचा चुना; जादूटोण्याचे प्रयोग करणारा जेरबंद

जालना : एक लाख रुपयाचे जादूने एक कोटी रुपये करून देतो, असे आमिष दाखवीत दोघांची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्ररकणी जादूटोणा करणाऱ्यास तालुका पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले. त्याच्याकडून जादूटोण्याच्या साहित्यासह एक लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.

रतन आसाराम लांडगे (रा. भक्तेश्वरनगर, जेल रोड, जालना) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पेरेजपूर (ता. साक्री, जि. धुळे.) येथील किशोर पंडित शेवाळे यांचे तीन लाख रुपये आणि त्यांचा पुतण्या दिलीप आसाराम शेवाळे यांचे अडीच लाख रुपये रतन लांडगे याने घेतले होते. एक लाखाचे एक कोटी करून देण्याचे आमिष दिले. परंतु, जादूटोण्याचे प्रयोग करीत आपली फसवणूक झाल्याचे शेवाळे यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (दि. १७) लांडगे याच्या घराची पंचांसमक्ष झाडाझडती घेतली. त्यावेळी जादूटोण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, रोख रक्कम असा एक लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पाेलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक संतोष साबळे, पोकॉ. माळी, काळे, जाधव यांच्या पथकाने केली.

मालिका निर्माताही अमिषाला बळी
पोलिसांनी लांडगे याच्या घराची झाडाझडती घेतली, त्यावेळी मालिका निर्माते पद्मनाभ जयप्रकाश राणे (वय-४१), विकास वसंत अनभवने (वय-४१), नारायण गजानन जोशी (वय-५२) हे तिघे आढळून आले. हे तिघेही एक लाख रूपये घेऊन लांडगे यांच्याकडे आल्याचे चौकशीत समोर आले. पोलिसांच्या धाडीमुळे त्यांची फसवणूक टळली.

मुंजा प्रकटला अन् चांदीचा मुकूट मागितला
किशोर शेवाळे आणि त्यांचा पुतण्या पैसे घेऊन गेल्यानंतर लांडगे याने मुंजा प्रकट करून दाखवितो, असे म्हणत त्यांना खोलीबाहेर नारळ ठेवायला सांगितले. नंतर लहान मुलाच्या सांगाड्यातून मुंजा प्रकट झाला असून, तुम्ही त्याचे दर्शन घ्या आणि त्याची इच्छा पूर्ण करा, असे सांगितले. रोहित शेवाळेने मुंजाची इच्छा विचारली असता मुंजाने चक्क पाच किलोचा चांदीचा मुकुट आणण्यास सांगितले. पैशाअभावी काका- पुतण्या लांडगे याच्या घरातून बाहेर आले. नंतर काही वेळानंतर शेवाळे यांनी पैसे नाहीत, असे म्हटले असता लांडगे याने मुकुटासाठी आग्रह धरला. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे शेवाळे यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली.

स्मशानभूमित आठ दिवस ठेवले लाडू
लांडगे याच्या सांगण्यानुसार शेवाळे यांनी सलग आठ दिवस स्मशानभूमीत लाडू ठेवला. नंतर लांडगे याची भेट घेतली असता तुम्ही चुकीच्या पद्धतीने लाडू ठेवला. काही दिवसानंतर शेवाळे पुतण्याला घेऊन आले. तेव्हा तुम्ही काहीतरी चुकीचे करता. पूजा पूर्ण होत नाही, असे म्हणत पुतण्या रोहितवर यांच्यावर प्रयेाग करण्यास सांगितले. त्यावेळी हातचालाखीने एक लाखाचे दोन कोटी करून दाखविले आणि नंतर रोहितकडून तीन लाख रूपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गोणीत कागदी बंडल अन् एक ५०० ची नोट
पोलिसांनी लांडगे याच्या घरातून एक काळ्या रंगाचा भालूचा मास्क, प्लास्टिकची मानवी कवटी, दोन पाय, दोन हात यासह इतर साहित्य व तीन पांढऱ्या गोण्यांमध्ये नोटांच्या आकाराने कापलेल्या कोऱ्या कागदाची बंडले, एका गोणीतील १६ बंडलांवर प्रत्येकी ५०० रूपयांची लावलेली एक नोट असा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Five and a half lakhs of lime, claiming to make one crore of a lakh; Man arrested for practicing witchcraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.