जालन्यात ‘जीबीएस’चा पहिला रुग्ण; परराज्यातून आल्यानंतर तब्येत बिघडली, रिपोर्ट पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 19:22 IST2025-03-11T19:19:06+5:302025-03-11T19:22:43+5:30
जीबीएसची लागण झालेली व्यक्ती खासगी कामानिमित्त १ मार्च रोजी बाहेरील राज्यात गेली होती

जालन्यात ‘जीबीएस’चा पहिला रुग्ण; परराज्यातून आल्यानंतर तब्येत बिघडली, रिपोर्ट पॉझिटिव्ह
जालना : जिल्ह्यातील एका २३ वर्षीय व्यक्तीस गुइलेन-बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस या दुर्मीळ आजाराची लागण झाल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात जीबीएसचा हा पहिलाच रुग्ण आढळून आला असून, शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
जीबीएसची लागण झालेली व्यक्ती खासगी कामानिमित्त १ मार्च रोजी बाहेरील राज्यात गेली होती. तेथून परतल्यानंतर रविवारी त्यांच्या पायांमध्ये कमजोरी जाणवू लागल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. डाॅक्टरांनी विविध तपासण्या केल्या असता रिपोर्टमध्ये जीबीएस पॉझिटिव्ह आला असल्याचे उघड झाले असल्याची माहिती खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांनी दिली. उपचार सुरू असलेला रुग्ण चांगल्या स्थितीत असून, धोक्याच्या बाहेर असल्याचेदेखील डॉक्टरांनी सांगितले आहे.
जिल्हा रुग्णालय मात्र अनभिज्ञ
जिल्ह्यात जीबीएसचा रुग्ण आढळून आला असला तरी, याबद्दल जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ डाॅक्टर मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, हा रुग्ण एका खासगी रुग्णालयातून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र, येथे आल्यानंतर त्यांच्या आजाराबद्दल वरवरच्या तपासण्या करून त्यास छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाकडे रेफर करून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी हात वर केले.