लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:33 IST2018-03-23T01:03:27+5:302018-03-23T11:33:48+5:30
महसूलच्या पथकाने पकडलेले ट्रॅक्टर पोलीस चौकीतून सोडविण्यासाठी एक हजार रुपयांची लाचेची मागणी करणा-या शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक विकास कोकाटे याच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड/वडीगोद्री : महसूलच्या पथकाने पकडलेले ट्रॅक्टर पोलीस चौकीतून सोडविण्यासाठी एक हजार रुपयांची लाचेची मागणी करणा-या शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक विकास कोकाटे याच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील तक्रारदार बीडमधील गेवराई तालुक्यातील आहे. त्यांचा ट्रॅक्टर अंबड हद्दीत वाळू तस्करी करताना महसूल पथकाने पकडून शहागड पोलीस चौकीत लावला होता. ट्रॅक्टर मालकाने कायदेशीर दंड भरून ट्रॅक्टर सोडवण्यासाठी महसूल अधिका-यांच्या आदेशाची प्रत शहागड चौकीत दिली. ट्रॅक्टर सोडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विकास कोकाटे यांनी एक हजार रुपये लाचेची मागणी केली. ट्रॅक्टर मालकाने यांनी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने सापळा लावला, मात्र कोकाटे यांनी लाच स्वीकारली नाही. ट्रॅक्टर मालक व उपनिरीक्षक कोकाटे यांच्या मोबाईल संवादावरून कोकाटेंविरुद्ध लाच प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्या अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने जामीन दिल्याचे जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी सांगितले.