निपाणी पिंपळगाव येथे पाणी भरताना विहिरीत पडून महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:31 IST2019-05-11T00:31:13+5:302019-05-11T00:31:57+5:30
घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथील सुदामती गंगाधर मिठे (वय ३५) या गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील विहिरीवर पाणी भरत असताना, पाण्यासाठी झालेल्या गर्दीमूळे त्या विहिरीत पडल्याने त्यांच्या मेंदूला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

निपाणी पिंपळगाव येथे पाणी भरताना विहिरीत पडून महिला जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथील सुदामती गंगाधर मिठे (वय ३५) या गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील विहिरीवर पाणी भरत असताना, पाण्यासाठी झालेल्या गर्दीमूळे त्या विहिरीत पडल्याने त्यांच्या मेंदूला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जालना येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
निपाणी पिंपळगावात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला एका टँकरने तालुक्यातील बोडखा या ठिकाणाहून पाणीपुरवठा सुरु आहे. या टँकरच्या दररोज तीन फेऱ्या होणे गरजेचे आहे. पंरतु, या टँकरची सकाळी एक आणि रात्री एक अशा दोनच फे-या होत आहेत. यामुळे पाणीटंचाई अधिक गडद झाली आहे. टँकरचे पाणी गावातील एका सार्वजनिक विहिरीमध्ये आणि एका आडामध्ये सोडण्यात येते.
गावामध्ये गुरूवारी रात्री ८ वाजता पाण्याचे टँकर आडामध्ये पाणी सोडत असताना आडावर पाणी भरण्यासाठी एकच गर्दी झाली. त्यावेळी ही दुर्घटना घडली. दरम्यान मिठे कुटुंब गरीब असून, उपचारासाठी गावातील नागरिकांनी लोकवर्गणी करून सात हजार रूपये जमा करून दिले.