'मोबाईल रिपेअरिंग' सोडून माळरानावर फुलविली 'ड्रॅगन फ्रूट'ची बाग; शेतकऱ्याला लाखोंचा नफा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:12 IST2025-12-12T12:09:36+5:302025-12-12T12:12:06+5:30
माळरानावर 'ड्रॅगन'ची लागवड, आधुनिक सिंचनाचा वापर; मराठवाड्यात विदेशी फळाची बंपर कमाई.

'मोबाईल रिपेअरिंग' सोडून माळरानावर फुलविली 'ड्रॅगन फ्रूट'ची बाग; शेतकऱ्याला लाखोंचा नफा
गणेश पंडीत/राहुल वरशिळ
जालना/केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील इंगळेवाडी येथील शेतकरी विलास हरीभाऊ इंगळे यांनी शेतीत प्रयोगशीलता दाखवत कोरडवाहू जमिनीत ‘ड्रॅगन फ्रूट’ ची परदेशी दर्जाची बाग उभारून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी मोबाईल रिपेअरिंगचे काम सांभाळत आधुनिक शेतीकडे वाटचाल करून आज लाखोंचा नफा मिळवून नव्या पिढीसमोर आदर्शवत उदाहरण ठेवले आहे.
पारंपरिक पिकांमध्ये सतत होणाऱ्या तोट्यामुळे नवा पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर २०२३ मध्ये विलास इंगळे यांनी एका एकरात तब्बल ४०० पोल त्यावर प्रत्येक चार ड्रॅगन फ्रूटची रोपे लावण्याचा निर्णय घेतला. कॅक्टस कुलातील हे पीक कमी पाण्यातही चांगले वाढत असल्याने त्यांनी आधुनिक ‘सिमेंट पोल’ पद्धतीबरोबरचठिबक सिंचनाचा वापर केला. त्यांनी या तंत्रज्ञानाद्वारे ५०-६० टक्के पाण्याची बचत साधली. शिवाय, गांडूळखत व सेंद्रिय खतांच्या नियोजनबद्ध वापरामुळे रोपांची वाढ, फुलधारणा आणि फळांची गुणवत्ता अधिक उत्तम झाली. मुरमाड जमिनीवरही हे पीक जोमाने वाढू शकते, हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले.
पहिल्या वर्षी साडेचार लाख खर्च
ड्रॅगन फ्रूटला लागवडीनंतर सुमारे १५ महिन्यांनंतर फळधारणा सुरू होते. त्यांनी दुसऱ्याच वर्षी प्रतिएकर १० ते १२ टन उत्पादन घेऊन लाखोंचा नफा मिळविला आहे. सध्या बाजारात ड्रॅगन फ्रूटला १०० ते ११० रुपये प्रतिकिलो भाव मिळत असल्याने एका एकरातूनही लाखोंची वार्षिक उलाढाल सहज शक्य होत आहे. एका पोलला चार कलमे असून एका कलमापासून ३० ते ५० फळे निर्माण होतात. पहिल्या वर्षी चार ते साडेचार लाख रुपये गुंतवणूक झाली; तर दुसऱ्या वर्षी फक्त ५० हजार रुपये खर्च आला. सध्या सिल्लोडमधील व्यापारी थेट शेतातूनच माल उचलून नेत असल्याने बाजारपेठेचीही अडचण भासत नाही.
कुटुंबाचा हातभार महत्त्वाचा
इंगळे कुटुंबाकडे एकूण नऊ एकर जमीन असून, स्वत:सह आई-वडि आणि पत्नी मिळून शेतीची जबाबदारी सांभाळतात. जून ते ऑक्टोबरदरम्यान सात वेळा फळ काढणी होते, ही या पिकाची खासीयत. परदेशात लोकप्रिय असलेले हे पीक आता मराठवाड्यातही शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय ठरत आहे. या पिकाला २० वर्ष वय असल्यामुळे कमी खर्च येतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही कमी खर्चातदेखील ही शेती करता येते.
- विलास इंगळे, शेतकरी, इंगळेवाडी, भोकरदन
मोबाईल रिपेअर ते यशस्वी शेतकरी
मोबाईल रिपेअरिंगचे काम सांभाळत २०२३ मध्ये त्यांनी एक एकरावर ४०० ड्रॅगन फ्रूट रोपे लावण्याचा निर्णय घेतला. यंदा या शेतीतून निव्वळ नफा ५ लाखांपेक्षा अधिक झाल्यामुळे त्यांनी शेतीकडे अधिक लक्ष देण्यास सुरूवात केली आहे.
सुरुवातीचा गुंतवणूक खर्च : ४ ते ४.५ लाख
वार्षिक देखभाल खर्च : ५० हजार रुपये
वार्षिक उत्पन्न खर्च : ८ ते १२ लाख
निव्वळ नफा खर्च : ५ ते १० लाख