शेतरस्त्यावरून शेजाऱ्याचा जाच असह्य झाल्याने शेतकऱ्याने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:15 IST2025-04-18T17:09:12+5:302025-04-18T17:15:01+5:30
सतत भांडणाला व जाचाला कंटाळून संपवले जीवन

शेतरस्त्यावरून शेजाऱ्याचा जाच असह्य झाल्याने शेतकऱ्याने संपवले जीवन
गोंदी (जि.जालना) : शेताच्या शेजारी असणाऱ्यांच्या जाचाला कंटाळून संतोष शेषराव शिर्के (वय ४५ वर्षे) या शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १५ एप्रिल रोजी पाथरवाला बुद्रुक (ता. अंबड) येथे घडली.
पाथरवाला तालुका अंबड येथील शेतकरी संतोष शेषराव शिर्के यांच्या आजोबाची पाथरवाला गावात गट नंबर २०९ व गट नंबर २१० मध्ये सात एकर तीन गुंठे एवढी शेतजमीन आहे. याच शेताच्या शेजारी मुरलीधर लोहारे, महादेव लोहारे, विष्णू लोहारे यांची शेतजमीन असून, शेतातील रस्त्याच्या वादातून संतोष शिर्के याच्यासोबत लोहारे यांचे वाद होत होते. लोहारे यांच्याकडून होणाऱ्या सतत भांडणाला व जाचाला कंटाळून संतोष शिर्के यांनी आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी महादेव बापू लोहारे, मुरलीधर बापू लोहारे, विष्णू बापू लोहारे, बाळू महादेव लोहारे, मीरा महादेव लोहारे यांचे नावाने सुसाईड नोटमध्ये त्यांनी या लोकांची नावे लिहिली होती. घटनेची माहिती समजताच गोंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खांडेकर व उपपोलीस निरीक्षक बलभीम राऊत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वरील सर्व आरोपीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या सर्वांना अटक करण्यात आली आहे.