फडणवीस संपवा-संपवी खात्याचे मंत्री, त्यांनी धनगर-मराठा जाती संपवल्या: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 14:09 IST2024-08-14T14:08:38+5:302024-08-14T14:09:50+5:30
देवेंद्र फडणवीस तुम्ही छगन भुजबळांच्या नादात सत्ता घालून बसणार: मनोज जरांगे

फडणवीस संपवा-संपवी खात्याचे मंत्री, त्यांनी धनगर-मराठा जाती संपवल्या: मनोज जरांगे
वडीगोद्री ( जालना) : धनगर आणि मराठा या दोन्ही जाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपवल्या, आता फडणवीस हे संपवा संपवी खात्याचे मंत्री असायला हवेत. त्यांनी सगळ्यांचा कार्यक्रम केला, अशी खरमरीत टीका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केली. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आटपून जरांगे पाटील अंतरवाली सराटीत आल्यानंतर आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली यादरम्यान ते बोलत होते.
जरांगे पुढे म्हणाले, आरक्षण द्यायला बारा महिने लागत नाहीत. देवेंद्र फडणवीस तुम्ही छगन भुजबळांच्या नादात सत्ता घालून बसणार. आम्ही पूर्ण तयारीला लागलो पाडायचे की लढायचे आम्ही ठरवू पण तुमचा कार्यक्रम लावणार, असा इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिला. मराठ्यांना लढावं लागणार हे लक्षात घेतलं चांगल्या संख्येने मराठा समाज एक येत आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १४ ते २० ऑगस्टपर्यंत होणार आहेत. राज्यातल्या सगळ्या मतदारसंघातील सर्वजाती धर्मातील लोकांनी डाटा घेऊन येणे आवश्यक आहे. कोणत्याही जातीचा असो, ज्यांना ज्यांना वाटतं की गोरगरिबांची सत्ता आली पाहिजे. त्यांनी यावं असे आवाहन जरांगे यांनी केले.
२९ ऑगस्टपर्यंत दिली मुदत
यांनी पक्क ठरवलं की मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. आजपासून पुन्हा २९ तारखेपर्यंत सरकारला पुन्हा वेळ दिला आम्हीच दिला मनाने आजपर्यंत सरसकट गून्हे मागे घ्यावे लागणार आहे. तुमचा खुर्चीत जीव आहे, आमचा आरक्षणात जीव आहे. त्यामुळे राजकीय भाषा वापरावीच लागेल ना, शंभूराजे तेव्हा आलते या विषयावर चर्चा झाली त्यानंतर झालीच नाही. आता २९ ऑगस्टला बघू उभा करायचे की पाडायचे.
देवेंद्र फडणवीस जाणूनबुजून आरक्षण मिळू देत नाहीत
शिंदे साहेब आरक्षण देतील पण फडणवीस साहेब देऊ देत नाहीत, ते अजित पवारांना देखील बोलून देत नाहीत, ते बोलतही नाही. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाहीत, असा आरोप जरांगे यांनी केला. तसेच मराठ्यात आणि ओबीसीत भांडण लावून दिले जात आहेत. ओबीसीतून आरक्षण देणार की नाही, हे सरकारने स्पष्ट करायला पाहिजे. गॅझेट आणायला तुम्हाला पैसे नाही, तर तुम्ही फक्त आकडा सांगा आम्ही एका दिवसात पैसे गोळा करून देतो, असे आवाहनही जरांगे यांनी केले.
लाडकी बहीण योजना म्हणजे सावकारी खेळ
आता समाज पहिल्या सारखा भोळा राहिलेला नाही. योजना द्यावी पण आता शंका येत आहे. कारण मतदान केलं तर बरं अन्यथा पैसे परत घेऊ, असं कुणीतरी बोलल आहे. हा मतदान विकत घेतल्यासारखा खेळ आहे. ही योजना म्हणजे सावकारी खेळ आहे.
आम्ही दुप्पट पैसे देतो
तुम्ही आरक्षण दिलं नाही तर मग आम्हाला तुम्हाला पाडावे लागणार. अधिवेशन, आचारसंहिता असा यांचा वेळकाढूपणा सुरू आहे. मराठ्यांच आरक्षण कुणी घालवलं हे सगळ्यांना माहीत आहे. ते बैठकीला आले नाही म्हणून तेच तेच बोलणार का? फडणविस यांनी वाटोळे केले. राज्यातील चव्हाण, फडणवीस, राणे हे माजी मुख्यमंत्री माझ्या विरोधात आहेत. सरकारने ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. आम्हाला आता डायरेक्ट कृती हवी आहे. २९ ऑगस्टच्या आत निर्णय घ्या झेरॉक्स आणायला तुम्हाला आम्ही दुप्पट पैसे देतो हैद्राबाद करून सगळे पुरावे आणा. २९ तारखेला आमचा निर्णय होईपर्यत आरक्षणाबाबत निर्णय घ्या. यांना दंगली घडवून आणायच्या आहेत जर आमचं वाटोळे केलं तर यांना खुर्ची मिळवू देणारं नाही. कागदपत्र तयार ठेवावे, सगळ्यांनी सावध राहावे असेही जरांगे म्हणाले.