पदाधिकारी जातायत तरी आत्मपरीक्षण नाही; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:50 IST2025-11-13T16:48:59+5:302025-11-13T16:50:02+5:30
शिवसेना मालक, नोकराचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष

पदाधिकारी जातायत तरी आत्मपरीक्षण नाही; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
जालना : तुमच्या कर्माने सरकार पडले. किती आरोप करणार? दगाबाज कोण? बेईमान कोण? हे जनतेने ठरविले. म्हणून तुम्ही ५६वरून २०वर आलात, तरीसुद्धा आत्मपरीक्षण नाही. भास्कर अंबेकर यांच्यासारखे पदाधिकारी शिवसेनेसोबत का जातायत ? याचा विचार करा. हा पक्ष मालक आणि नोकरांचा नसून कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान इथे केला जातो, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
जालना येथे बुधवारी सायंकाळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आ. अर्जुन खोतकर, आ. हिकमत उढाण, पंडित भुतेकर, भास्कर अंबेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. शिंदे म्हणाले, खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत. मी डॉक्टर नाही, तरीही मी छोटी-मोठी ऑपरेशन बरोबर करतो. राज्यात सरकार नावाचा प्रकार राहिला नव्हता. विकासकामे थांबली होती. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचे काम केले म्हणून उठाव करावा लागला. विधानसभेत ८० पैकी ६० जागा जिंकल्या. आम्हाला शिव्या देणाऱ्यांनी ११० जागा लढवून २० जागा जिंकल्या. तुम्ही आरोप करीत राहा, मी कामातून उत्तर देत राहीन. शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मदत केली. सरकारने ३२ हजार कोटींचे पॅकेज दिले. खात्यात पैसे जमा होत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करताना अनेकांनी आरोप केले, आजही करतायत. परंतु, ती योजना बंद होणार नाही, असेही ते म्हणाले.
खुर्ची, सत्ता आमचा अजेंडा नाही
सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी जनतेला सोन्याचे दिवस आणायचे आहेत. आमचा अजेंडा खुर्ची, सत्ता नाही, आमचा अजेंडा ज्यांनी खुर्चीत बसविले त्यांचे प्रश्न सोडविणे हा आहे. पदे येतात - जातात, सत्ता येते - जाते. नाव गेले की परत येत नाही. तेच नाव जपले पाहिजे. बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार जपले पाहिजेत. मी आज कार्यकर्ता म्हणून काम करीत असून, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. राज्यातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सर्वांत मोठी आहे, असेही शिंदे म्हणाले.