अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही आन्वा येथे पाणीटंचाई कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:37 IST2018-11-29T00:37:01+5:302018-11-29T00:37:16+5:30
पाणी पुरवठ्याचे एकही टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही आन्वा येथे पाणीटंचाई कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे नायब तहसीलदार तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी पाहणी केली होती. मात्र असे असताना आता आठवडा उलटला आहे. तरी देखील पाणी पुरवठ्याचे एकही टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
आन्वा हे भोकरदन तालुक्यातील एक मोठे गाव आहे. या गावाची लोकसंख्या १२ हजार एवढी आहे. या गावात गेल्या दहा ते १२ वर्षापासून पाणीपुरवठ्याची ओरड कायम असल्याचे ग्रामस्थांनी सािंगतले. आता किमान या गावात लक्ष देऊन कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. असे असताना याकडे ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने परिस्थिती निर्माण झाली आहे. आठवडभरापूर्वी नायब तहसीलदार काशीनाथ तांगडे आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी आन्वा येथे भेट देऊन जलस्त्रोतांची पाहणी केली होती. विहिरींनी तळ गाठला असून, आजूबाजूला पाण्याचा कुठलाच खात्रीशीर पर्याय नसल्याने चार टँकर सुरू केल्याशिवाय गावाची तहान भागणार नाही अशी मागणी यावेळी आन्वाचे सरपंच मदन कुलवाल यांनी केली आहे.
या संदर्भात ग्रामविकास अधिकारी महेंद्र साबळे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती सरपंच कुलवाल आणि उपसरपंच अमरजीत देशमुख यांनी दिली. एकूणच एवढी गंभीर स्थिती असताना प्रशासन कुठल्या आधारावर टँकर सुरू करण्यास मान्यता देत नाही, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.