जालन्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा, आठजण ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 19:39 IST2018-04-23T19:38:44+5:302018-04-23T19:39:05+5:30

मंठ्यात चारजणांना अटक

eight arrested in jalana for betting on ipl match | जालन्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा, आठजण ताब्यात 

जालन्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा, आठजण ताब्यात 

जालना : जालना व मंठा शहरातील हॉटेल्समध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या आठ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघादरम्यान रविवारी रात्री सुरू असलेल्या सामन्यावेळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी महागडे मोबाईल्स, एलसीडी टीव्ही व रोख सव्वा दोन लाख रुपये जप्त केले. 

शहरातील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सदर बाजार पोलिसांनी रात्री उशिरा द ग्रेट मंमादेवी हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी काहीजण टीव्हीसमोर बसून राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्स या संघादरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावताना आढळून आले. पोलिसांनी संशयित अमित हिरालाल रठ्ठैय्या (२७, रा. कपडाबाजार), विनोद दादुराव रठैय्या ( ४२, रा. आदित्य कॉम्पलेक्स), शेख नजीर शेख इब्राहीम (४३ रा. खडकपुरा), रुपेश गणेश घोडके ( ३२, रा. लालबाग) यांना ताब्यात घेतलं. यातील हिरालाल रठैय्या व अन्य एक मुख्य बुकींसोबत मोबाईलवर संपर्क करून, तसेच टेलिग्रॉम अ‍ॅपवर ऑनलाइन लिंक तयार करून सट्टा लावत होते. मुख्य बुकी संशयित सोनू चौधरी, विनोद भगत, सुरज काबलिये हे फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

पोलिसांनी या कारवाईत महागडे मोबाईल्स, एलसीडी टीव्हीसह रोख एक लाख ७४ हजार ३५० जप्त केले. संशयितांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, विशेष कृती दलाचे यशवंत जाधव, पोलीस निरीक्षक महादेव राऊत, कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख, शिवाजी जमधडे, मनोज काळे, कैलास खार्डे, संदीप बोंद्रे, संतोष पवार, सुधीर वाघमारे, फुलचंद गव्हाणे, किरण चेके, देविदास भोजणे, श्रीकुमार आडेप यांनी ही कारवाई केली.

मंठ्यातही चौघांना अटक
मंठ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी  रविवारी रात्री पथकासह शहरातील एका हॉटेलमध्ये छापा आयपीएल सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या चार संशयित बुकींना ताब्यात घेतलं. अमोल  गणेशराव मोरे (रा. देवठाणा), भागवत रामदास कव्हळे (रा. वांजूळा) दीपक रामेश्वर तोडकर (रा. तुकारामनगर) व दीपक महादेवराव बोराडे (रा. बोराडेगल्ली, मंठा), अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सात मोबाईल्स, एलसीडी टीव्ही व रोख ५० हजार रुपये जप्त केली आहे.
 

Web Title: eight arrested in jalana for betting on ipl match