भाजप किसान मोर्चाच्या जालना जिल्हाध्यक्षांची महिलांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:09 IST2019-01-29T01:08:45+5:302019-01-29T01:09:25+5:30
जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे शेतीच्या वादातून भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी साथीदारांच्या मदतीने एका शेतकऱ्यासह तीन महिलांना जबर मारहाण केली.

भाजप किसान मोर्चाच्या जालना जिल्हाध्यक्षांची महिलांना मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी (जि. जालना) :
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात सोमवारी भाजप राज्य कार्यकारिणीचे मंथन सुरू असतानाच जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे शेतीच्या वादातून भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी साथीदारांच्या मदतीने एका शेतकऱ्यासह तीन महिलांना जबर मारहाण केली. यानंतर त्यांना खड्ड्यात जिवंत पुरण्याचाही प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून भवर यांना अटक करण्यात आली आहे.
निवडुंगा येथील शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभराड व कृष्णा खांडेभराड यांच्या गट क्र. ४१७ मधील शेताचा न्यायालयात वाद सुरू आहे. सोमवारी सकाळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर व अन्य १० ते २० जणांनी या शेतात पोकलेनने विहीर खोदण्याचा प्रयत्न केला. यावेळी खांडेभराड यांनी या जमिनीचा वाद चालू आहे. त्यावर अद्याप निकाल लागलेला नाही, असे सांगून काम थांबविण्याचा प्रयत्न केला. यावर संतप्त होऊन भवर व इतरांनी गंगा बळीराम खांडेभराड, रेणुका कृष्णा खांडेभराड, प्रयाग विष्णू खांडेभराड व विठ्ठल नामदेव खांडेभराड यांना जबर मारहाण करून जखमी केले. इतकेच नाही तर तेथे असलेल्या एका खड्ड््यात या चौघांना पुरण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेजारी शेतकरी मदतीला धावल्याने मोठा अनर्थ टळला. आरोपींनी याशिवाय खांडेभराड यांच्या कुटुंबातील महिलांना अश्लील शिवीगाळ करत त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या शेतक-यांनाही जातीवाचक शिव्या दिल्या. या प्रकरणी ज्ञानेश्वर खांडेभराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून रावसाहेब भवर यांना अटक करण्यात आली आहे.
दवाखान्यात येऊनही मारहाण
यातील जखमी महिला व शेतक-याला टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथेही आरोपींपैकी काहींनी येऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे टेंभुर्णीतही काही काळ तणाव निर्माण झाला होता.
भवर यांच्या तक्रारीवरून गुन्हा
या प्रकरणी रावसाहेब भवर यांनीही परस्परविरोधी तक्रार दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, आपण गट क्र. ४१७ ही खरेदी खतावर कृष्णा खांडेभराड, ज्ञानेश्वर खांडेभराड आदींकडून घेतली आहे. मात्र या जमिनीचा वाद सुरू असला तरी खरेदीपासून माझ्या ताब्यात आहे. सोमवारी मी व माझे नातेवाईक या शेतात विहीर खोदण्यासाठी आलो असता विठ्ठल खांडेभराड, ज्ञानेश्वर खांडेभराड व त्यांच्या घरातील महिलांसह सात जणांनी हे काम अडवून आमचे पूजेचे साहित्य फेकून दिले. व आम्हाला शिवीगाळ व मारहाण करून मशीन पेटविण्याची धमकी दिली. यात माझे निवडुंगा येथील सासरे व मेव्हणे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथे पाठविण्यात आले आहे. शिवाय भवर यांच्या पत्नीचे सोन्याचे गंठण या मारहाणीत हरविल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर खांडेभराड व अन्य सात जणांवर टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.