दीड कोटी रुपयांच्या मंजुरीवरून सभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:59 AM2019-12-11T00:59:37+5:302019-12-11T00:59:58+5:30

सभा संपल्यानंतरच अध्यक्षांनी सदर रकमेत वाढ करून १ कोटी ५० लाखांच्या कामांना मंजुरी दिली. अध्यक्षांनी कोणत्या अधिकाराखाली या कामांना मंजुरी दिली, असा सवाल करत भाजपच्या सदस्यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला.

Dispute in the meeting over the approvals of one and a half crore rupees works | दीड कोटी रुपयांच्या मंजुरीवरून सभेत गोंधळ

दीड कोटी रुपयांच्या मंजुरीवरून सभेत गोंधळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मागील सभेत सिंचन विभागातून बांधकाम विभागात १ कोटी रुपये वर्ग करण्याचा ठराव घेण्यात आला होता. या ठरावाला सभागृहाने मंजुरी देखील दिली होती. परंतु, सभा संपल्यानंतरच अध्यक्षांनी सदर रकमेत वाढ करून १ कोटी ५० लाखांच्या कामांना मंजुरी दिली. अध्यक्षांनी कोणत्या अधिकाराखाली या कामांना मंजुरी दिली, असा सवाल करत भाजपच्या सदस्यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला. त्यानंतर या कामाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली.
मंगळवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती कळंबे, सभापती तौर, सभापती बनसोडे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांची उपस्थिती होती.
सभेची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर हैदराबाद व उन्नाव येथील घटनेत मयत झालेल्यांना युवतींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सदस्य अवधूत खडके म्हणाले की, मागील सभेत अध्यक्षांनी सिंचन विभागातून बांधकाम विभागात १ कोटी रुपये वर्ग केले होते. याबाबत सभेत ठरावही घेण्यात आला. परंतु, अध्यक्षांनी या रक्कमेत ५० लाखांची वाढ करून कामांना मंजुरी दिली. या रकमेत वाढ करण्याची गरज काय ? तसेच सभा संपल्यानंतर अध्यक्षांनी रात्री आठ वाजता सदरील रकमेच्या कामांना मंजुरी दिली. रातोरात मंजुरी देण्याचे कारण काय, असा सवाल करून या कामात अनियमित्तता झाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अवधूत खडके यांनी केली. या प्रकरणावरूनच सभेत गोंधळ उडाला. भाजपचे सदस्य व अध्यक्षांमध्ये वादावादी झाली. यावर उत्तर देताना अध्यक्ष म्हणाले, सदर प्रकरणात कुठल्याही प्रकारची अनियमित्तता झाली नाही. तुम्ही म्हणत असला तर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर सदस्य शालीकराम म्हस्के यांनी या प्रकरणावरून अध्यक्षांना धारेवर धरले. कार्योत्तर देण्यासाठी अध्यक्षांनी कोणता अधिकार वापरला. याचे उत्तर अध्यक्षांनी द्यावे. उत्तर नसेल तर रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले, अध्यक्षांचे काम असेल तर प्रशासन २४ तास उपलब्ध असते. परंतु, शेतकरी, सदस्यांची कामे असेल तर प्रशासन उपलब्ध नसल्याचेही ते म्हणाले. या सभेस सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
म्हस्के : मालकीच्या जागेवर दुकाने थाटली
जिल्हाभरात जेवढ्या जि.प.च्या मालकीच्या जागा आहे. त्यांना तारेचे कुंपण करा, अशी मागणी मागील दीड ते दोन वर्षांपासून मी आणि जयमंगल जाधव यांनी केली. परंतु, अद्यापही प्रशासनाने या जागांना कंपाऊंड केले नाही. त्यामुळे काही जागांवर तर दुकाने थाटली आहेत.
भोकरदन येथे जि.प.च्या जागेवर अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सदस्य शालीकराम म्हस्के यांनी केला.

Web Title: Dispute in the meeting over the approvals of one and a half crore rupees works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.