धूलिवंदनाला रंगांचे नव्हे तर विचारांचे होते मंथन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:42 IST2018-03-02T00:41:37+5:302018-03-02T00:42:00+5:30
धुलिवंदन म्हणजे रंगाची उधळण करीत द्वेष, मत्सर इ. बाबींना तिलांजली देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. परंतु खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राने विचारांचे मंथन घडवून आणत समाजातील गूढ प्रश्नांची उकल करुन त्यावर सर्वानुमते उपाय शोधण्याची परंपरा पंधरा वर्षांपासून जपली आहे.

धूलिवंदनाला रंगांचे नव्हे तर विचारांचे होते मंथन!
राजेश भिसे । विष्णू वाकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : धुलिवंदन म्हणजे रंगाची उधळण करीत द्वेष, मत्सर इ. बाबींना तिलांजली देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. परंतु खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राने विचारांचे मंथन घडवून आणत समाजातील गूढ प्रश्नांची उकल करुन त्यावर सर्वानुमते उपाय शोधण्याची परंपरा पंधरा वर्षांपासून जपली आहे. यंदा या स्तुत्य उपक्रमाचे सोळावे वर्ष आहे.
कृषीरत्न विजयअण्णा बोराडे, कृषीभूषण भगवानराव काळे तसेच येथील विश्वस्त, कर्मचारी आणि येथे येणारा जाणकार शेतकरीवर्ग तसेच सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्या विचार मंथनातून धूलिवंदनाच्या दिवशी आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन त्यावर उपस्थितांनी आपली मते आपली भूमिका मांडायची आणि यावरून निर्माण समस्येवर योग्य तो उपाय, तोडगा काढण्याचा स्वत:चा प्रयत्न नेमका कोणता याविषयीची जाण सर्वांना करून द्यायची. नैराश्याच्या गर्तेतून आनंदी जीवन जगण्याचा मार्ग शोधण्याचा वेध येथे घेतला जातो. तो सर्वांच्या सहकार्याने वेळप्रसंगी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना योग्य निर्णयाप्रत आणून सोडणारा. कार्यक्रमास मराठवाड्यातून आपले विचार मांडण्यासाठी येथील विचार घेऊन जाण्यासाठी नागरिक येथे येतात. औरंगाबाद, परभणी, बीड येथून विचारवंतांची संख्यादेखील मोठी असते. हा उपक्रम संपूर्ण मराठवाड्यातून येणा-यांसाठी वैचारिक मेजवानी देणारा असल्याने याचा प्रसार दिवसेंदिवस अधिक प्रमाणात होत आहे.
आरोग्य, शिक्षण, शेतकरी, शेती, स्वच्छता अशा बहुविध विषयांचा ठाव येथे घेण्यात आलेला आहे. ‘आम्ही सुधारु आमचे गाव’, ‘ग्रामीण भागातील विकासाची घडी विस्कटली जात आहे काय’ इ. गंभीर विषयांवर मंथन होऊन यातून अनेकांनी आपल्या जीवनात बदल करून घेतले. हेच या अनोख्या धूलिवंदन कार्यक्रमाचे यश म्हणता येईल. कृषी विज्ञान केंद्राने राबविलेला हा उपक्रम म्हणजे समाजक्रांतीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.