खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत! 'एमसीझेडएमए'कडे पालिकेचा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:23 IST2026-04-03T13:23:53+5:302026-04-03T13:23:53+5:30

कंत्राटदाराची निश्चिती; कामाला मुहूर्त नाही

Desalination Project Awaiting Approval Municipal Corporation Submits Application to MCZMA | खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत! 'एमसीझेडएमए'कडे पालिकेचा अर्ज

खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत! 'एमसीझेडएमए'कडे पालिकेचा अर्ज

सीमा महांगडे
मुंबई:
खारे पाणी गोडे करण्याच्या मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी किनारी क्षेत्र व्यवस्थापनाची (एमसीझेडएमए) अद्याप अंतिम मंजुरी मिळाली नसल्याने कामाला मुहूर्त मिळालेला नाही. ही परवानगी मिळविण्यासाठीचा मुंबई महापालिकेचा अर्ज 'एमसीझेडएमए'च्या २५ मार्चच्या बैठकीपुढे ठेवला होता. मात्र, त्यावर निर्णय झाला नाही, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यात समुद्रकिनाऱ्यावरील विकासकामांसाठी एमसीझेडएमएची परवानगी आवश्यक असते. सागरी पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊन प्रकल्पांना मंजुरी दिली जाते. दरम्यान, महापालिकेने या प्रकल्पाच्या उभारणीसाठी जीव्हीपीआर इंजिनीअर्स लि. या कंपनीची निवड केली आहे.

शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रकल्पाची गरज

मुंबईला दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, अपर वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून होतो. पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा निःक्षारीकरण प्रकल्प मनोरी येथे राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र, तीन - चार वर्षापासून हा प्रकल्प निविदा प्रक्रियेतच अडकला होता. शेवटी या प्रकल्प बांधकामासाठी जीव्हीपीआर इंजिनीअर्स लि. या कंपनीची निवड झाली असून, सर्व मंजुऱ्यानंतर लवकरच प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पश्चिम उपनगरातील पाच वॉर्डाची तहान भागणार

पी उत्तर मालाड, पी दक्षिण गोरेगाव, आर मध्य बोरीवली पश्चिम, आर उत्तर दहिसर पश्चिम आणि आर दक्षिण कांदिवली पश्चिम या वॉर्डाना या प्रकल्पातून पाणी मिळेल. सध्या भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई शहर व पश्चिम उपनगरांना पाणीपुरवठा होतो. मनोरीतील प्रकल्प कार्यन्वित होताच, भांडुप संकुलातील या पाच वॉर्डाच्या वाट्याचे पाणी शिल्लक गरजेच्या ठिकाणी वळते करता येणार आहे. अक्षय्य उर्जेचा वापर करणारा मुंबईतील हा पहिलाच प्रकल्प असेल.

प्रकल्पखर्चात एक हजार कोटींनी वाढ 

मनोरी प्रकल्पासाठी तीन हजार ५२० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता तो आता साधारण एक हजार कोटींनी वाढला आहे. प्रकल्पाचे आरेखन व बांधकामाचा खर्च तीन हजार २०० कोटी असून, प्रकल्पपूर्तीनंतर देखभाल, दुरुस्तीसाठी २० वर्षांसाठी एक हजार २०० कोटी खर्च येणार आहे.

समुद्रात दोन किमी लांबीचे बोगदे 

मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पांतर्गत, समुद्रात दोन किमी लांबीचे दोन बोगदे बांधावे लागणार आहेत. प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात दररोज २०० दशलक्ष लिटर, तर दुसऱ्या टप्प्यात २०० दशलक्ष लिटर असे एकूण ४०० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे.

Web Title : मनोरी अलवणीकरण परियोजना अनुमोदन की प्रतीक्षा में, लागत बढ़ी

Web Summary : मुंबई की मनोरी अलवणीकरण परियोजना, जिसका उद्देश्य जल आपूर्ति को बढ़ावा देना है, एमसीजेडएमए की मंजूरी का इंतजार कर रही है। लागत ₹1000 करोड़ बढ़ गई है। परियोजना नवीकरणीय ऊर्जा का उपयोग करते हुए और समुद्र के नीचे सुरंगों के माध्यम से पानी खींचकर पांच पश्चिमी उपनगरीय वार्डों को पानी की आपूर्ति करेगी।

Web Title : Manori Desalination Project Awaits Approval, Faces Cost Increase

Web Summary : Mumbai's Manori desalination project, aimed at boosting water supply, awaits MCZMA approval. Cost has increased by ₹1000 crore. The project will supply water to five western suburban wards, utilizing renewable energy and drawing water through undersea tunnels.