वृद्ध पती-पत्नीचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 16:00 IST2024-09-08T15:59:44+5:302024-09-08T16:00:19+5:30
तळणी ( जालना ) : वृद्ध पती-पत्नीचा घारतच कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ ...

वृद्ध पती-पत्नीचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, परिसरात खळबळ
तळणी (जालना) : वृद्ध पती-पत्नीचा घारतच कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ही घटना रविवारी सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान तळणी परिसरातील शिरपूर (ता. मंठा) गावातील आदीवासी वस्तीवरील मुंगसाजी परिसरात घडली. एका घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे घटना उघडकीस आली. धोंडिबा कानुजी कोकाटे (वय ८०), तर वच्छलाबाई धोंडिबा कोकाटे (वय ७४) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.
मंठा तालुक्यातील शिरपूर गावातील आदीवासी वस्तीवरील मुंगसाजी परिसरात धोंडिबा व त्यांची पत्नी वच्छलाबाई हे दोघेही एकत्र राहत होते. त्यांना चार मुले आहेत. त्यातील एक गावात, तर तिघे बाहेरगावी वास्तव्यास आहेत. या मृत पती-पत्नीने आठ-दहा दिवसांपूर्वी स्वत:जवळ असलेल्या बकऱ्यांची विक्री केली होती. त्यातून त्यांना दीड ते दोन लाख रूपये मिळाले होते. या पैशातून त्यांचा खून झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत धोंडिबा कोकाटे व वच्छलाबाई कोकाटे यांचा मृतदेह मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हे कुटूंब गेल्या १५ वर्षांपासून या गावात वास्तव्यास आहे. या पती-पत्नीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे. याचा तपास मंठा पोलिस करीत आहेत, अशी माहिती तळणी पोलिस चौकीचे बीट जमादार रखमाजी मुंडे यांनी दिली आहे.