'उसापासून इथेनॉलनिर्मिती बंदीचा निर्णय तुघलकी'; केंद्राच्या अध्यादेशाची स्वाभिमानीकडून होळी
By विजय मुंडे | Updated: December 9, 2023 19:37 IST2023-12-09T19:36:49+5:302023-12-09T19:37:40+5:30
अधिकचे उत्पन्न घटणार असल्याने साखर कारखानदारांबरोबरच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप

'उसापासून इथेनॉलनिर्मिती बंदीचा निर्णय तुघलकी'; केंद्राच्या अध्यादेशाची स्वाभिमानीकडून होळी
वडीगोद्री ( जालना) : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारचा उसापासून इथेनॉलनिर्मिती बंदीच्या अध्यादेशाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. इथेनॉलनिर्मिती बंदीचा निर्णय तुघलकी असल्याच्या तीव्र भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
केंद्र सरकारने गुरुवारी देशातील सर्व साखर उद्योगांनी उसापासून इथेनॉल निर्मिती बंद करावी, असा अध्यादेश काढला आहे. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले इथेनॉल प्रकल्प अडचणीत येणार तर आहेतच, तसेच या निर्णयामुळे इथेनॉलनिर्मितीतून मिळणारे अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार नाही. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. याचा परिणाम उसाच्या अंतिम दरावर होणार आहे. दुष्काळी स्थितीमुळे ऊस उत्पन्नात मोठी घट झाली असल्याने शेतकरी आधीच चिंतेत होता. त्यामुळे या निर्णयाचा थेट परिणाम शेतकऱ्यावर होत आहे.
केंद्र सरकारच्या या तुघलकी निर्णयामुळे साखर कारखान्यांचे नुकसान तर होणार आहे, याशिवाय उपपदार्थांच्या निर्मितीमधून मिळणाऱ्या अधिकचे उत्पन्न घटणार असल्याने साखर कारखानदारांबरोबरच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केला. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे, भारत उंडे, बाप्पासाहेब काळे, बाबासाहेब दखणे, नारायण डहाळे, शिवाजी वनवे, शिनगारे आदींची उपस्थिती होती.