जालन्यात क्रूरतेचा कळस! जुन्या वादातून आई-वडिलांसमोरच २५ वर्षीय मुलाची रॉडने ठेचून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:18 IST2025-10-25T16:17:08+5:302025-10-25T16:18:41+5:30
या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जालन्यात क्रूरतेचा कळस! जुन्या वादातून आई-वडिलांसमोरच २५ वर्षीय मुलाची रॉडने ठेचून हत्या
जालना: शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीने आता टोक गाठले आहे. जुन्या वादातून टवाळखोर तरुणांनी २५ वर्षीय विकास लोंढे याची लाठ्याकाट्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मयत विकास लोंढे (वय २५, रा. नूतन वसाहत) हा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लोंढे यांचा मुलगा. तो शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ ते १२:३० वाजेच्या दरम्यान एका नातेवाईकाच्या लग्न समारंभातून घरी परतत होता. घरापासून अवघ्या काही अंतरावर असतानाच काही टवाळखोर तरुणांनी त्याला अडवले.
आई-वडिलांसमोरच मुलावर हल्ला
जुना वाद उकरून काढून टवाळखोरांनी विकासला अमानुष मारहाण करायला सुरुवात केली. आरडाओरडा ऐकून विकासचे आई-वडील आणि आसपासचे नागरिक भांडण सोडवण्यासाठी धावले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. टवाळखोरांनी विकासच्या डोक्याला आणि पायाला लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केली होती. आपला मुलगा या गुंडांनी ठार मारला, हे कळताच विकासच्या आईने मध्यरात्रीच टाहो फोडला. ही हृदयद्रावक घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
उपचारादरम्यान मृत्यू
नागरिक जमा होत असल्याचे पाहताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या विकासला तात्काळ जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचाराला सुरुवात केली, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यानच विकास लोंढे याचा मृत्यू झाला.
टवाळखोरांवर कठोर कारवाईची मागणी
मृत्यू होण्यापूर्वी विकासने एका मित्राला मारहाण करणाऱ्या तरुणांची नावे सांगितली. त्याचा हा जबाब एका मित्राने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. मयत विकास लोंढे यांचे वडील प्रकाश लोंढे आणि सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित टवाळखोर गुंड हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी सकाळी घटनास्थळी पंचनामा केला असून, फॉरेन्सिक टीमनेही तपासणी केली आहे.