दूध काढताना गाईने लाथ मारली, मालकाने रागात डोक्यात फावडे घातले; गाईचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 19:48 IST2025-04-02T19:47:54+5:302025-04-02T19:48:04+5:30
दूध काढताना गाईने लाथ मारल्याने मालकाचा राग अनावर

दूध काढताना गाईने लाथ मारली, मालकाने रागात डोक्यात फावडे घातले; गाईचा जागीच मृत्यू
जालना : दूध काढताना गायीने लाथ मारल्याच्या रागातून मालकानेच तिच्या डोक्यात फावडे घातले. या घटनेत गायीचा मृत्यू झाला असून, मालकाविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ एप्रिल रोजी रात्री जामवाडी (ता.जालना) येथे घडली.
हर्ष भगवान बनकर असे गुन्हा दाखल झालेल्या पशुपालकाचे नाव आहे. जामवाडी येथील एका व्यक्तीने १ एप्रिल रोजी रात्री गायीला ठार मारल्याची माहिती विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षल गणेशराव दंडाईत (रा. जालना) यांना मिळाली होती. त्यानुसार दंडाईत व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता एका गायीचा मृतदेह आढळून आला.
गायीचे मालक हर्ष भगवान बनकर यांना विचारणा केली असता गायीचे दूध काढताना तिने लाथ मारली होती. त्यामुळे तिच्या डोक्यात फावडे मारले आणि तिचा मृत्यू झाल्याचे बनकर याने सांगितल्याची तक्रार दंडाईत यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिली. त्या तक्रारीवरून हर्ष बनकर विरोधात भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.