Construction work of courtyards jammed | अंगणवाड्यांची बांधकामे ठप्प

अंगणवाड्यांची बांधकामे ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : १७ कोटी ५० हजार रूपये खर्च करून जिल्हाभरातील १८७ अंगणवाडड्यांची बांधकामे करण्यात येत आहेत. या अंगणवाड्यांचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे. यातील काही अंगणवाड्यांचे बांधकाम सुरू आहे. तर काही अंगणवाड्यांच्या बांधकामाला अद्यापही मुहूर्त लागला नाही. यातच वाळू पट्ट्यांचे लिलाव रखडल्यामुळे बांधकामासाठी वाळू मिळत नसल्याने कंत्राटदार हैराण झाले आहे. मुदत संपायला एक महिन्याचाच कालावधी शिल्लक असल्याने शासनस्तरावरून भांडून आणलेला अखर्चित निधी पुन्हा अखर्चित राहण्याची शक्यता आहे.
जालना जिल्ह्यात १९४६ लहान - मोठ्या अंगणवाड्या आहे. यातील काही अंगणवाड्या मोडकळीस आल्या आहे. तर काही अंगणवाड्यांना इमारती नसल्यामुळे त्या समाजमंदिर, शाळेत भरतात. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाड्या बांधकामासाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, पाठपुरावा करूनही निधी मिळत नव्हता. तत्कालीन जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी २०१५-१६ व १६-१७ मधील अखर्चित निधी शासनास्तरावरून आणला. हा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करायचा आहे. परंतु, निधीच्या प्रशासकीय मान्यता देण्यास विलंब होत आहे.
अंगणवाडी बांधकामासाठी १७ कोटी ५० हजारांचा निधी देण्यात आला. या निधीतून जिल्हाभरातील १८७ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. यातील काहीच अंगणवाड्यांचे बांधकाम सुरू झाले आहे. तर काही अंगणवाड्यांच्या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ अद्यापही झाला नाही. ज्या अंगणवाड्यांचे बांधकाम सुरू झालेले आहे. त्यांना वाळू पट्ट्यांचे लिलाव रखडल्यामुळे वाळू मिळत नसल्याने अंगणवाड्यांची इमारतीचे बांधकाम करण्यास विलंब लागत आहे. त्यातच पुढील महिन्यांपासून पाणीटंचाईला सुरूवात होणार असल्याने शासनस्तरावरून भांडून आणलेला अखर्चित निधी पुन्हा अखर्चित राहण्याची शक्यता आहे.
जालना : गुजरातमधून वाळू जालन्यात
गेल्या सहा महिन्यांपासून वाळूची कुत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. वाळू घाटांच्या लिलावाचा प्रश्न दुर्लक्षित होत गेल्याने बांधकाम ठप्प असून, यावर उपाय म्हणून आता थेट गुजरामधील तापी नदीतील वाळू ५२ हजार रूपयांमध्ये दहा ब्रास आणली जात आहे.
विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार आणि नवीन वाळू धोरणामूळे जिल्ह्यात सोने मिळेल पण..वाळू मिळत नसल्याचे चित्र आहे. सोन्यापेक्षाही वाळूचे दर आज वाढलेले आहेत. यावर उपाय म्हणून अनेकांनी आता थेट गुजरात मधील वाळू विक्रेत्यांशी संपर्क साधला आहे.
गुजरातमधून एक वाळूचे टीप्पर हे ५२ हजार रूपयांना दहा ब्रासचे मिळत आहे. अनेकजण ही ही वाळू आणून आपले बांधकाम उरकत आहेत. विशेष म्हणजे गुजरातमधून आणलेल्या या टीप्पर चालकांकडून त्या परिसरातील वाळूची रॉयल्टी भरल्याच्या पावत्या असल्याचे ग्राहकांना सांगितले जात आहे.

Web Title: Construction work of courtyards jammed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.