गुन्ह्यात अटक न करण्यासाठी सात हजाराची लाच घेताना हवालदार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 06:50 PM2020-05-13T18:50:39+5:302020-05-13T18:51:04+5:30

हवालदार पिल्ले यांनी तक्रारदाराच्या कामासाठी तडजोडीअंती २० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे समोर आले.

Constable arrested while accepting bribe of Rs 7,000 to help in investigation in Jalana | गुन्ह्यात अटक न करण्यासाठी सात हजाराची लाच घेताना हवालदार जेरबंद

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी सात हजाराची लाच घेताना हवालदार जेरबंद

googlenewsNext

जालना : गुन्ह्यात अटक न करता न्यायालयात हजर करावे व तपासात मदत करण्याच्या कामासाठी सात हजार रूपयांची लाच घेणाऱ्या अंबड ठाण्यातील हवालदारास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. ही कारवाई बुधवारी सकाळी अंबड येथील प्रिन्स लॉजजवळ करण्यात आली.

जॉन पांडीयन पिल्ले (रा. रामनगर कॉलनी, जालना) असे पोलिसांनी पकडलेल्या हवालदाराचे नाव आहे. एका तक्रारदारासह त्याच्या कुटुंबातील  सदस्यांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यात अटक न करता कोर्टात हजर करावे, तपासात मदत करणे या कामासाठी अंबड पोलीस ठाण्यातील हवालदार जॉन पिल्ले यांनी ४० हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार संबंधित तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. 

या तक्रारीनुसार ११ मे रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी हवालदार पिल्ले यांनी तक्रारदाराच्या कामासाठी तडजोडीअंती २० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी अंबड शहरातील प्रिन्स लॉजजवळ सापळा रचला. हवालदार पिल्ले यानी तक्रारदाराच्या कामासाठी लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून ७ हजार रूपये स्वीकारले. त्यानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून पिल्ले यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चवरिया, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक रवींद्र निकाळजे, पोनि एस.एस.शेख, पोनि संग्राम ताटे, मनोहर खंडागळे,  ज्ञानदेव जुंंबड, अनिल सानप, ज्ञानेश्वर म्हस्के, गणेश चेके, सचिन राऊत, शिवाजी जमधडे,  चालक प्रवीण खंदारे, आरेफ शेख यांच्या पथकाने केली.

Web Title: Constable arrested while accepting bribe of Rs 7,000 to help in investigation in Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.