आधी सत्तेत तर या मग आरक्षण रद्द करण्याचे बोला; मनोज जरांगे यांची राहुल गांधींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 15:10 IST2024-09-12T15:09:18+5:302024-09-12T15:10:24+5:30
देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून राज्यात सरकारी आंदोलन सुरू; जरांगे यांचा निशाणा

आधी सत्तेत तर या मग आरक्षण रद्द करण्याचे बोला; मनोज जरांगे यांची राहुल गांधींवर टीका
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : काय करायचं करा, सत्ता आली तर पाहिजे ना, सत्ता येण्याच्या आधीच आरक्षण कसे रद्द करता, अशी बोचरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी कॉँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केली. आज दुपारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.
राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य केले होते. यावरून वादंग उठले आहे, यावर मराठा आरक्षण नेते जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे म्हणाले, ''ते परदेशात बोलले की समुद्रात उभे राहून माहिती नाही. त्यांचा राजकीय मामला आहे, त्याचा आमच्याशी काही संबंध नाही. काय करायचं करा, सत्ता आली तर पाहिजे ना, सत्ता येण्याच्या आधीच कसे रद्द करणार आरक्षण''
राज्यात सरकारी आंदोलन सुरू आहे
तसेच बार्शीचे आमदार राऊत यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे, याचा वर जरांगे यांनी तीव्र शब्दात टीका केली. ''गोरगरिबांच्या लोकांसाठी आम्ही लढत आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून राज्यात सरकारी आंदोलन सुरू आहेत. समाजासाठी आम्ही किती लढलो हे समाजाला माहित आहे,समाज हुशार आहे, समाज सगळं बघतोय'' अशी टीका करत राजकीय पक्षाचे जोडे उचलणारे, राजकीय पक्षाला बाप मानणारे असे किती आले, किती गेले, ही सगळी भाजप संपणार आहे, असा इशारा जरांगे यांनी दिला.
... तुमचे राजकीय करियर बाद करतो
माझं काम आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हे माझे कर्तव्य आहे. मी कोणत्याही आंदोलनाला थेट बसून जातो,कोणी यावं म्हणून मी आंदोलन करत नसतो. कोणी लक्ष द्यावं म्हणून काही करत नाही, एक वर्ष झालं मी समाजासाठी आंदोलन करतो, मी कसला विचार करत नाही. कोण येणार आहे, कोण येणार नाही हे न पाहता आंदोलन करतो असे जरांगे यांनी स्पष्ट करत थोडे थांबा तुमचा राजकीय करियर बाद करतो, असे आव्हान प्रसाद लाड यांना दिले.
असलं रडकं सरकार केव्हाच नाही बघितलं
फडणवीस साहेब खूप हुशार आहेत. चाणक्य आहेत असं वाटायचं. परंतु, ते फक्त फोडाफोडीत हुशार आहेत. भाजपाचेच लोक त्यांचा कार्यक्रम लावणार आहे. तुम्ही आरक्षण देऊन टाका. फडणवीस साहेब तुम्हाला इमानदारीने सांगतो. तुम्हाला विरोधक, शत्रू मानलेलं नाही. तुम्ही आरक्षण देऊन टाका. समाज तुमचा फायदा करेल, तुम्ही नाही दिलं तर खेळखल्लास, असा इशारा जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.