मंगळसूत्रचोर अवतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:39 IST2019-03-14T00:39:13+5:302019-03-14T00:39:28+5:30
बुधवारी दुपारी जुना जालना भागातील एका महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याने मोठी खळबळ उडाली

मंगळसूत्रचोर अवतरले
जालना : जालना शहरात मंगळसूत्र चोरट्यांचा माग काढण्यात पोलीसांना हवे तेवढे यश आलेले नाही. गेल्याच आठवड्यात झालेल्या गोवत्स महाराजांच्या भागवत कथेत चार महिलांचे मंगळसूत्र लांबविले होते. तर संक्रांतीलाही अशा घटना घडल्या होत्या. त्यातच बुधवारी दुपारी जुना जालना भागातील एका महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
जुना जालना भागातील भाग्यनगरस्थित चाईल्डहूड या शाळेत असलेल्या मुलाला आणण्यासाठी रागिनी अमित वाघ या दुपारी १२ वाजेच्या सुमारास गेल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या युवकानी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. तोंडाला रूमाल बांधलेल्या या दोन तरूणांनी गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याने वाघीरकर यांच्या गळ्याला जखमा झाल्या आहेत. घटना घडल्यावर त्यांनी आरडा-ओरड केली. त्यावेळी परिसरातील नागरिक मदतीला धावून आले.