केंद्र सरकार संविधान नाहीतर एकाधिकारशाही राबवत आहे : बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 18:08 IST2019-08-05T18:05:27+5:302019-08-05T18:08:10+5:30
केंद्र सरकार हे राज्य घटनेला पायदळी तुडवत आहे.

केंद्र सरकार संविधान नाहीतर एकाधिकारशाही राबवत आहे : बाळासाहेब थोरात
जालना : राज्यातील शिवसेना - भाजप सरकार हे बनवा- बनवी करणारे सरकार आहे. नागरिकांच्या मनामध्ये काँग्रेस विषयी आजही आत्मीयता आहे. याच बळावर आगामी काळात सरकार आणि मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी येथे बोलतांना व्यक्त केला.
सोमवारी जालना शहरात आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आ. कल्याण काळे, कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी मंत्री अनिल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना थोरात म्हणाले की, केंद्रातील सरकार हे राज्य घटनेला पायदळी तुडवत आहे. त्यातील मार्गदर्शक तत्वांऐवजी एकाधिकारशाही राबवत आहे. तसेच मराठवाड्यात दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. तर मुख्यमंत्री यात्रेनिमित्त जल्लोष करत आहेत. कर्जमाफी ही फसवी घोषणा असल्याची टिकाही थोरात यांनी यावेळी केली.
याच कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही सरकारच्या धोरणांवर टिका केली. आगामी काळात मराठवाडा विभागाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी लढा उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीने ईव्हीएम मशीनवर मतदान घेवू नये, असा ठरावा, संमत करण्याचे आवाहनही उपस्थितीत कार्यकर्त्यांना केले.