कारने हुलकावणी दिल्याने जीप उलटली; मित्राच्या लग्नाला जाणारे ७ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 17:06 IST2021-07-27T17:05:42+5:302021-07-27T17:06:21+5:30
Accident at Jalana : कारने हुलकावणी दिल्याने चालकाचा ताबा सुटून जीप उलटली.

कारने हुलकावणी दिल्याने जीप उलटली; मित्राच्या लग्नाला जाणारे ७ जण जखमी
अंबड/वडीगोद्री : जालना येथे मित्राच्या लग्नासाठी जाणाऱ्या जीपला समोरून येणाऱ्या कारने हुलकावणी दिल्याने जीप उलटल्याची घटना जालना- वडीगोद्री रस्त्यावरील अंबड तालुक्यातील झिरपी येथे मंगळवारी पहाटे घडली. या अपघातात ७ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर अंबड येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथून देवा कुंदे, सुनील गायकवाड, दीपक वैद्य, आसिफ कुरेशी, सचिन साळुंके, नितीन झांबरे व अन्य काही जण हे जीपने ( क्रमांक एम.एच.१६.सिक्यू.२२६४) मंगळवारी सकाळी जालना येथे मित्राच्या लग्नासाठी जात होते. जालना- वडीगोद्री रस्त्यावरील झिरपी गावाजवळ आल्यावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने हुलकावणी दिल्याने जीप चालकाचा ताबा सुटून गाडी उलटली.
या अपघातात देवा कुंदे, सुनील गायकवाड, दीपक वैद्य, आसिफ कुरेशी, सचिन साळुंके, नितीन झांबरे हे गंभीर जखमी झाले. घटना घडताच, आजूबाजूच्या नागरिकांनी जखमींना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी अंबड येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.