कार-दुचाकी अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:23 IST2019-09-24T00:23:22+5:302019-09-24T00:23:30+5:30
भरधाव कार-दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा येथे घडली.

कार-दुचाकी अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : भरधाव कार-दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा येथे घडली.
गोरख विठ्ठल नागरे (५४ रा. संगम जळगाव ता. गेवराई) असे मयताचे नाव आहे. गोरख नागरे व त्यांच्या पत्नी नयना नागरे (५०) हे दोघे सोमवारी सकाळी गेवराई येथून दुचाकीवरून अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील सासरवाडीला जात होते. औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील दोदडगावच्या फाट्यावर औरंगाबादहून बीडकडे भरधाव जाणाऱ्या कारने (क्र.एम.एच.४३- एक्स. ३०९२) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील नागरे दाम्पत्य जखमी झाले.
अपघातात गोरख नागरे यांच्या डोक्याला, पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी असलेले बळीराम मुंडे व इतर तरुणांनी त्यांना तात्काळ पाचोड येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेले. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मयताच्या पार्थिवावर गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.
गेल्या चारवर्षापासून या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु, रस्ता ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर खराब होता. त्यावेळी अनेक छोट्या-मोठ्या अपघातामध्ये अनेकांचा बळीही गेला होता. तर अनेक जण जायबंदी झाले होते.
औरंगाबाद- सोलापूर हा महामार्ग चौपदरी व्हावा, म्हणून गेल्या पाच ते सात वर्षापासून काम सुरू आहे. हे काम कधी निधीअभावी तर कधी जमीन संपादनावरून अडविण्यात आले होते.