बिबट्या कॅमेऱ्यात कैद; पण पिंज-यात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:26 IST2018-10-04T00:26:19+5:302018-10-04T00:26:26+5:30

बिबट्या कॅमेऱ्यात कैद; पण पिंज-यात नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अंबड तालुक्यातील वडीगोद्री व परिसरात बिबट्याच्या दहशतीने परिसरातील दहशत कायम आहे. या बिबट्याने वडीगोद्री जवळील गुंडेवाडी परिसरात बुधवारी ग्रामस्थांना पुन्हा दर्शन दिले. मात्र या बिबट्याने कोणावर हल्ला केला नाही. मात्र, या भागात बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले असून, बिबट्याच्या हालचाली चार दिवसांपूर्वीच वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमे-यात कैद झाल्या आहेत. हा बिबट्या तीन वर्षाचा असावा असे अनुमान काढले आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात एकजण ठार झाला आहे.
गेल्या दोन महिन्यापासून वडीगोद्री तसेच परिसरातील काही गावात बिबट्या आल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाला दिली होती. दरम्यानच्या काळात या बिबट्याने परिसरातील अनेक गायी, म्हशी, वासरावर हल्ला करून आपली भूक भागविली होती. मात्र, आता या भागातील ग्रामस्थांना या बिबट्याची जणूकाही सवयच झाली अशा स्थितीत आता भीती दूर झाल्याचे ग्रामस्थांनी वन विभागातील अधिकाºयांना सांगितले. असे असले तरी ग्रामस्थांनी या भ्रमात राहू नये, तो हिंस्त्र प्राणी आहे. तो केव्हाही हल्ला करू शकतो. अशी सूचना दिली आहे.
वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या परिसरात यापूर्वीच तीन पिंजरे लावले आहेत. तसेच तीन पथकांची स्थापना केली असून, वनविभागाचे चार कर्मचारी हे परिसरात रात्रीची गस्त तसेच वेळप्रसंगी मुक्काम करत असल्याची माहिती जालना येथील वनिविभागाचे वरिष्ठ अधिकारी जी.एम. शिंदे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. बिबट्याचे दर्शन हे वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमे-यात टीपल्या आहेत. तसेच तो शार्प शूटर आणि वैद्यकीय पथकाच्या नजरेसही आला होता. त्याला बेशुद्ध करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली असतानाच तो त्या भागातील उसाच्या शेतात पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.
बुधवारी रात्री देखील पथकातील सदस्य जागता पहारा देणार आहेत. कुठल्याही स्थितीत त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पाणी सोडल्याने अडचण : जी. एम. शिंदे
पैठण येथील नाथसागरातून वडीगोद्री जवळील उजव्या कालव्याला गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी सोडले आहे. हे पाणी परिसरातील शेतक-यांनी उसाला दिले आहे. त्यामुळे पूर्वी पाणी आणि भक्ष्याच्या शोधात बिबट्या उसाच्या शेतातून बाहेर पडत होता.
मात्र, आता त्याला उसाच्या शेतात पाणी मिळत असल्याने तो क्वचितच बाहेर येत आहे. भूक लागल्यावरच तो बाहेर पडणार असल्याने त्याच्या हालचालींवर आता बारकाईने लक्ष दिले जात असल्याचे सहायक वनसंरक्षक अधिकारी जी.एम. शिंदे यांनी सांगितले.
धावडा येथे गायीचा फडशा
धावडा : भोकरदन तालुक्यातील मेहगाव परिसरात बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. बुधवारी सकाळी या भागातील शेतकरी शेरखान सरदार खान पठाण यांच्या शेतात बिबट्याने गोठ्यातील बांधलेल्या गायीचा फडशा पाडला. सकाळी पठाण यांचा मुलगा इब्राहीम खान हा शेतात आला असता त्याला गोठ्यात गाय न दिसल्याने शोध घेतला असता मक्याच्या शेतात बिबट्या दिसल्याने तो घाबरून गेला. त्याने आरडा-ओरड केल्याने परिसरातील शेतकरी धावून आले. तोपर्यंत बिबट्याने तेथून पळ काढला होता. याच भागातील जाहेद गुलाब यांनाही बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले. ही माहिती वन विभागाला कळविली आहे. या प्रकारामुळे भीती निर्माण झाली आहे.