भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 13:53 IST2025-10-24T13:52:17+5:302025-10-24T13:53:19+5:30
छगन भुजबळांनी गॅझेटविरोधात पाच याचिका दाखल केल्या; हे तुमच्या परवानगीशिवाय शक्य आहे का? जरांगे पाटलांचा फडणवीसांना थेट सवाल

भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
वडीगोद्री (जालना)- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट उद्देशून म्हटलं की, हैदराबाद गॅझेटनुसार तातडीनं प्रमाणपत्र वाटप सुरू करा. तुम्ही मराठ्यांची मनं जिंकली आहेत, ती कायम ठेवायची असतील तर वेळ घालवू नका.
यावेळी जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांना उद्देशून ते म्हणाले, सरकारमधील लोकं हैदराबाद गॅझेट विरोधात कोर्टात जात आहेत, हे कसं चालतंय? छगन भुजबळांनी गॅझेटविरोधात पाच याचिका दाखल केल्या, हे तुमच्या परवानगीशिवाय शक्य आहे का?
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याचं सांगत जरांगे म्हणाले, फडणवीस साहेब, लोकांनी तुमच्यावर मोकळ्या मनानं प्रेम केलं आहे. तुम्ही मोठ्या मनानं जीआर काढला, पण भुजबळ त्याला विरोध करताहेत. तुमच्या बळाशिवाय ते असे करुच शकत नाहीत.
जरांगे यांनी स्पष्ट मागणी केली की, भुजबळांचा जमीन रद्द करुन त्यांना मंत्रिमंडळात बाहेरचा रस्ता दाखवा. तसेच, येत्या कॅबिनेट बैठकीत सातारा संस्थांचे गॅझेट काढा. आता आमच्यात थांबायची क्षमता नाही. सरकारने विलंब केला, तर आम्ही पुन्हा निर्णायक आंदोलन छेडू. मराठा समाजाची सहनशीलता आता संपत आली आहे, असेही जरांगे पाटलांनी यावेळी स्पष्ट केले.