मटका व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी लाच; जालन्यातील फौजदारासह पोलिस शिपाई अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 16:34 IST2025-05-17T16:33:50+5:302025-05-17T16:34:43+5:30
मटका व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी २५ हजारांची मागणी, रक्कम स्वीकारली अन् परतही केली

मटका व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी लाच; जालन्यातील फौजदारासह पोलिस शिपाई अटकेत
जालना : मटका व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारून ती परत करणाऱ्या जालना तालुका पोलिस ठाण्यातील फौजदारासह पोलिस शिपायावर नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. ही कारवाई गुरुवारी १५ मे रोजी रात्रीच्या सुमारास तालुका पोलिस ठाणे परिसरात करण्यात आली. पोउपनि. परशुराम पवार, पोलिस शिपाई लक्ष्मण शिंदे अशी लाचखोरांची नावे आहेत.
मटका व्यवसाय चालविणाऱ्या एकास पोलिस शिपाई लक्ष्मण शिंदे यानी मटका चालवायचा असेल तर ३० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी २ एप्रिल रोजी केली होती. त्यानंतर १७ एप्रिल रोजीही परशुराम पवार यांच्या मार्फत पैशांची मागणी करण्यात आली. त्यामुळे संबंधित व्यक्तीने मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तेथून नंदुरबारच्या पथकाला कारवाईबाबत निर्देश दिले होते.
पोलिस उपाधीक्षक राकेश चौधरी यांनी तक्रारीनुसार लाचेची पडताळणी वेळोवेळी केली. त्यानंतर १५ मे रोजी परशुराम पवार यांनी २५ हजार रुपये स्वीकारले आणि दरमहा तीन हजार रुपये देण्याची मागणी केली; परंतु लक्ष्मण शिंदे फोन उचलत नसल्याने ती रक्कम तक्रारदारांना परत केल्याची तक्रार तक्रारदाराने तालुका पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार फौजदार पवार व पोलिस कर्मचारी शिंदे विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.