अन् दोघांनाही अश्रू अनावर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:26 IST2019-02-19T01:24:38+5:302019-02-19T01:26:34+5:30
वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून मिळालेले बक्षीस पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांना देण्याची घोषणा घनसावंगी तालुक्यातील मत्स्योदरी विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली.

अन् दोघांनाही अश्रू अनावर...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून मिळालेले बक्षीस पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांना देण्याची घोषणा घनसावंगी तालुक्यातील मत्स्योदरी विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली. दरम्यान, घोषणा करताच ‘त्या’ दोघांना अश्रू अनावर झाले.
सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जनार्दनमामा वादविवाद स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड येथील विद्यार्थी गायत्री तुकाराम रक्ताटे व ओंकार सारंगधर काळे या दोघांना बक्षीस म्हणून टॅब देण्यात आले. या दोघांनी हे बक्षीस शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांना देण्याची घोषणा केली. दरम्यान, अध्यक्ष खोतकर बोलत असताना या दोन्ही विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले . यावेळी सभागृहातील प्रत्येक जण भावूक झाला. या दोन्ही विद्यार्थ्यांना शिक्षक दीपक आघाव यांनी मार्गदर्शन केले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सदस्यांचा रोष
जालना : पाणी उपलब्ध असताना टॅकरचा प्रस्ताव पाठवल्या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी भोकरदन तालुक्यातील पोखरी येथील ग्रामसेवकास निलंबित केले. या प्रकरणावरून सभेत चांगलाच गोंधळ झाला.
भोकरदन तालुक्यातील पोखरी येथील ग्रामसेविका ए. ई. सोनुने यांनी गावात पाणी उपलब्ध असतांनाही टॅकरचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला होता. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी कोणतीही चौकशी न करता त्यांना निलंबित केले. पाणी उपलब्ध असताना ग्रामसेवकाने टॅकरचे प्रस्ताव पाठवणे हे चुकीचे नसून, त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज नसल्याचे सदस्य म्हणाले. या कारवाईमुळे ग्रामसेवक टँकरचे प्रस्ताव पाठवत नसून, मुख्य कार्यकारी अधिका-यांनी निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करत सभेत गोंधळ घातला.
दरम्यान, या कारवाईनंतर तिस-याच दिवशी या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तेव्हा गावातील पाणी गायब कसे झाले, असा सवाल सदस्य शालिकराम म्हस्के यांनी उपस्थित केला. तेवढ्यात सदस्य विठ्ठल चिंचपुरे म्हणाले की, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा या अकार्यक्षम अधिकारी आहेत. यावरुन सदस्य व अध्यक्षांमध्ये चांगलाच वाद झाला. यावर उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, मी प्रत्यक्ष पाहणी करुन चौकशी करणार आहेत. त्यानंतरच हे निलंबन मागे घेण्यात येईल. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या मुद्यावरून भाजपचे सदस्य अवधूत खडके यांनी सभात्याग केला. यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेतर्फेही मदत
पुलवामा येथे शहीद झालेले जवान नितीन शिवाजी राठोड आणि संजय राजपूत यांच्या कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या सदस्यांतर्फे महिन्याभराचा तर अधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने दिवसभराचा पगार देण्यात येणार असल्याचे जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले आहेत. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. आता आपल्याला त्यांच्या कुटुंबियांना मदत करायला पाहिजे. यासाठी जिल्हा परिषदेचे सर्वच सदस्य महिन्याभराचा पगार शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहे. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, प्रशासनाच्या वतीनेही शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यात येईल. अधिकारी व कर्मचारी एक दिवसाचा पगार शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहे.