पाय घसरून विहिरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह काढला बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:47 IST2019-10-14T00:46:39+5:302019-10-14T00:47:00+5:30
पाय घसरून विहिरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह रविवारी पहाटे पर्यंत मोटारीद्वारे पाण्याचा उपसा करून बाहेर काढण्यात आला.

पाय घसरून विहिरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह काढला बाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : पाय घसरून विहिरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह रविवारी पहाटे पर्यंत मोटारीद्वारे पाण्याचा उपसा करून बाहेर काढण्यात आला. ही घटना भोकरदन तालुक्यातील चांधई टेपली शिवारातील शनिवारी दुपारी घडली होती.
चांधई टेपली येथील दिलीप सीताराम पवार (२३) हा युवक शनिवारी दुपारी शेतात गेला होता. विहिरीजवळ गेल्यानंतर पाय घसरल्याने तो आतमध्ये पडला. आसपासच्या नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर विहिरीकडे धाव घेऊन दिलीपला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, विहिरीत ४० फुटाच्यावर पाणी असल्याने तो सापडला नाही. यावेळी गावातील नागरिकांनी, नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस चौकीचे सहायक फौजदार शंकर काटकर, जमादार विष्णू बुनगे, होमगार्ड सुधाकर टेपले, परमेश्वर टेपले यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध कार्य सुरू केले. परंतु विहिरीतील पाण्यामुळे दिलीपचा शोध लागला नव्हता.
त्यानंतर विहिरीतील पाणी उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी विद्युत पंप व इंजिनच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसा सुरू केला. रविवारी पहाटेपर्यंत पाण्याचा उपसा केल्यानंतर दिलीपचा मृतदेह आढळून आला. राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर रविवारी दुपारी चांधई टेपली येथे मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत युवकाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.