The body was found three days later | तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील दहिगाव शिवारातील रायघोळ नदीच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी जळकी शिवारातील धामणा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळून आला. ही घटना ११ सप्टेंबर रोजी रात्री घडली होती.
राजू सातवा जाधव (५२ रा. पिंपळगाव रे.) असे मयताचे नाव आहे. राजू जाधव व त्यांचे मित्र सचिन गुप्ता हे दोघे ११ सप्टेंबर रोजी शिवना (ता. सिल्लोड) येथे गिरणीचा पाटा टाकण्यासाठी गेले होते. रात्री दुचाकीवरून पिंपळगावकडे ते परतत होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दहिगाव शिवारातील रायघोळ नदीला आलेल्या पुरात दोघेही दुचाकीसह वाहून गेले होते. सचिन गुप्ता यांच्या हाती बाभळीच्या झाडाची फांदी लागल्याने ते सुदैवाने बचावले. मात्र राजू जाधव हे पुरात वाहून गेले होते. त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासनाने शोध मोहीम हाती घेतली होती.
१२ सप्टेंबर रोजी हिसोडा शिवारातील नदीत त्यांची दुचाकी सापडली. मात्र राजूचा शोध लागत नव्हता. त्यानंतर तहसीलदार संतोष गोरड, पराधचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे, मुख्याधिकारी अमित सोंडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. भोकरदन व जालना येथील अग्निशामक दलाच्या दोन टीम बोलाविण्यात आल्या.
दोन दिवसांपासून राजूचा शोध सुरू केला होता. शेवटी १४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान जळकी शिवारातील धरणातील पाण्यात राजू जाधव यांचा मृतदेह सापडला. घटनास्थळी डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. भोकरदन नगरपरिषदेच्या पथकातील शशिकांत खेडेकर, वैभव पुणेकर, रफिक कादरी, समाधान गायकवाड, कृष्णा इचे, जालन्याचे जाधव यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: The body was found three days later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.