'बिजल्या'ने पालटले शेतकऱ्याचे नशीब; २५ शर्यती जिंकल्या, आता ११ लाख ११ हजारांना विक्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:40 IST2025-11-05T18:33:36+5:302025-11-05T18:40:27+5:30
बैल नव्हे, 'लकी चार्म'! ५१ हजारांचा 'बिजल्या' विकला ११ लाख ११ हजारांना

'बिजल्या'ने पालटले शेतकऱ्याचे नशीब; २५ शर्यती जिंकल्या, आता ११ लाख ११ हजारांना विक्री!
वाटूर (जालना) : मंठा तालुक्यातील कानफोडी येथील शेतकरी पवन राठोड हे एक बैल विकून लखपती झाले आहेत. हे ऐकून अनेकांना धक्का बसेल. परंतु, हे खरे आहे. या कुशल शेतकऱ्याने पट्ट्यावरील धावणाऱ्या बैलाचे पालन-पोषण केले आणि त्याला उत्कृष्ट प्रशिक्षित करून तयार केले. त्यानंतर तो बैल ‘बिजल्या’ म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्यात घोड्यालाही घाम फोडवणारी ताकद असल्याचे बोलले जात होते.
बिजल्या हा शंकर पटातील बैल असल्यामुळे त्याचे मूल्य अधिक होते. त्याची उंची, ताकद आणि तालमेल पाहून त्याला उच्च किंमत दिली जात होती. अखेर सांगली जिल्ह्यातील कटरेवाडी येथील सागर कटरे यांनी हा बैल ११ लाख ११ हजार रुपयांना खरेदी केला. या विक्रीमुळे पवन राठोड यांचे आर्थिक जीवनच बदलले असून, ते एका दिवसात लखपती झाले आहेत. बैलावर प्रेम, नियमित प्रशिक्षण आणि काळजी घेतल्यामुळेच बिजल्या इतका मौल्यवान झाला. मेहनत आणि चिकाटीने एखाद्या प्राणी किंवा शेतीतील उत्पादनातून मोठा लाभ मिळवता येतो. बिजल्या विक्रीमुळे मंठा तालुक्यातील शेतकरी आणि प्राणीपालकांत उत्सुकता निर्माण झाली आहे, असे पवन राठोड यांनी सांगितले.
बिजल्याने ३० पैकी जिकल्या २५ शर्यती
शंकरपटतात शर्यतीत घोड्यांसोबत भाग घेतला आणि पहिलं स्थान पटकावले. जालना, वाशिम, जिंतूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर येथील ३० पैकी २५ शर्यतींमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून, ३ ते ४ लाख रुपये कमाई केली आहे. रोज सकाळी ७ वाजता २ किमी चालून वर्कआऊट करून त्यांनी आपल्या फिटनेसचा रेकॉर्ड राखला आणि शर्यतीत घोड्यांसारखे धावून यश मिळवले.
सोशल मीडियावर ३ हजार फॉलोअर्स
'बीजल्या' नावाचा बैल आता सोशल मीडियावरही चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर त्याचा रिल पोस्ट होताच ३ हजार फॉलोअर्स झाले. मैदानात धावताना लोक त्याला 'बिजल्या' म्हणून हाक मारतात. ५ सेकंदात ६० पॉईंट धावत हा बैल मराठवाड्यातील धावपटू बैलांमध्ये अद्वितीय ठरला आहे.
५१ हजारांत घेतला हेाता विकत
शेतकरी राठोड यांनी तमिळनाडूहून १० महिन्यांच्या वयात ५१ हजारांत विकत घेतलेला ‘बिजल्या’ आता प्रगतीपथावर आहे. १५ महिन्यांत त्याला आहारात रोज ३ लिटर दूध, १०० ग्रॅम बदाम, १ किलो उडीद डाळ, सायंकाळी मका व गहू भरडा दिला जातो. दर दोन दिवसांनी त्याची गरम पाण्याने अंघोळ घालून निगा राखली जात होती.