रोहयोंतर्गत केलेल्या कामांचे ऑडिट सुरू; त्रुटी आढळल्यानंतर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 06:00 PM2020-09-12T18:00:14+5:302020-09-12T18:08:14+5:30

महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तहसील, वनीकरण, रेशीम, वनविभाग, पंचायत समिती, बांधकाम विभाग, कृषी विभागामार्फत विविध कामे केली जातात.

Audit of works done under MANAREGA started; Action will be taken after finding the error | रोहयोंतर्गत केलेल्या कामांचे ऑडिट सुरू; त्रुटी आढळल्यानंतर होणार कारवाई

रोहयोंतर्गत केलेल्या कामांचे ऑडिट सुरू; त्रुटी आढळल्यानंतर होणार कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्दे१० कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती पहिल्या टप्प्यात ६० गावांचा समावेश

जालना : महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जालना तालुक्यातील १४४ गावांत २०१९-२० मध्ये करण्यात आलेल्या विविध कामांचे आॅडिट सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी कंत्राटी तत्त्वावर दहा ग्रामसाधन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ६० गावांमधील कामांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल दिला जाणार आहे.

महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तहसील, वनीकरण, रेशीम, वनविभाग, पंचायत समिती, बांधकाम विभाग, कृषी विभागामार्फत विविध कामे केली जातात. ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्यासाठी अधिकाधिक कामे मजुरांकरवी करून घेतली जातात. बांधबंधिस्ती, बंधारे निर्मिती, रोपवाटिका, विहिरींची कामे, रस्ते, शौचालये, शेततळे आदी विविध कामे रोहयोंतर्गत केली जात आहेत. विशेषत: जलसंधारणाच्या अधिक कामांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. होणारी कामे नियमानुसार करावीत, अशा सूचना वेळोवेळी वरिष्ठस्तरावरून बैठका घेऊन केल्या जातात. मात्र, अनेकजण शासकीय सूचनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. 

तालुक्यात गावा-गावांमध्ये रोहयोंतर्गत झालेली कामे आणि होत असलेली कामे दर्जेदार झाली आहेत का ? कोणत्या कामात बोगसपणा आहे का ? याचे आॅडिट करण्याचा निर्णय तालुका प्रशासनाने घेतला आहे. जालना तालुक्यातील १४४ गावांमध्ये रोहयोंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचे आॅडिट केले जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात ६० गावांची निवड करण्यात आली असून, १० ग्रामसाधन व्यक्तींची या आॅडिटसाठी निवड करण्यात आली आहे. आॅडिटला येणाऱ्या टीमला करण्यात आलेल्या कामाचे अंदाजपत्रक, निधी यासह इतर आवश्यक ती कागदपत्रे संबंधित यंत्रणेने त्वरित उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कागदपत्रे उपलब्ध करून न देणाऱ्या यंत्रणेवर, अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

नियुक्त केलेल्या ग्रामसाधन व्यक्तींकडून गावस्तरावर जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली जात आहे. पहिल्या टप्प्यातील ६० गावांमध्ये प्रारंभी पाच गावे, नंतर ३० गावे व नंतर १५ गावांमधील कामांची प्रत्यक्षात पाहणी केली जाणार आहे. राहयों अंतर्गत तालुक्यात करण्यात आलेल्या आणि केल्या जाणाऱ्या कामांचा दर्जाचा अहवाल एका महिन्याच्या आत वरिष्ठांना देण्याच्या सूचनाही संबंधित ग्रामसाधन व्यक्तींना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, वरिष्ठस्तरावरून रोहयोच्या कामाचे आॅडिट सुरू झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

या गावांचा आहे समावेश
जालना तालुक्यातील भिलपुरी, मानेगाव (ज.), मानेगाव (खा.), बाजीउम्रद, जळगाव (सो.), पीर कल्याण, वखारी वडगाव, साळेगाव घारे, चितळी पुतळी, घोडेगाव, निपाणी पोखरी, पिंप्री डुकरी, सावरगाव हडपसह तालुक्यातील एकूण ६० गावांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. चार टप्प्यात गावा-गावातील कामांना भेटी देऊन आॅडिट केले जाणार आहे. या आॅडिट दरम्यान गावातील अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी पथकाला सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नियमानुसार कारवाई
रोहयोंतर्गत तालुक्यात करण्यात आलेल्या विविध कामांचे आॅडिट ग्रामसाधन  व्यक्तींकडून केले जात आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर एखाद्या कामात काही त्रुटी आढळल्या किंवा कामे निकृष्ट आढळली तर ते काम करणाऱ्या संबंधित यंत्रणेवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.           
- श्रीकांत भुजबळ, तहसीलदार, जालना

Web Title: Audit of works done under MANAREGA started; Action will be taken after finding the error

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.