१० रुपयांचे आमिष देऊन विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेने फसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:49 IST2025-02-07T16:45:32+5:302025-02-07T16:49:11+5:30
ग्रामस्थांनी अपहरणकर्त्यास बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले; अंबड तालुक्यातील शहागड येथील घटना

१० रुपयांचे आमिष देऊन विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेने फसला
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : अंबड तालुक्यातील वाळकेश्वर येथील एका ११ वर्षीय शाळकरी मुलाचा अपहरण करण्याचा प्रयत्न शहागड येथिल ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे फसला. अपहरणकर्त्याला शहागड येथील ग्रामस्थांनी पकडून चांगलाच चोप देऊन गोंदी पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी ११. ३० वाजेच्या दरम्यान शहागड बस स्थानकाजवळ घडली.
अंबड तालुक्यातील वाळकेश्वर येथिल राजविर अनिल पवार हा शहागड येथील जिल्हा परिषद शाळेत सहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे. पोटात त्रास होत असल्याने राजविर शाळेतून लवकर बाहेर निघत घराकडे निघाला. याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याचा पाठलाग सुरू केला. वाळकेश्वरकडे जाणाऱ्या शहागड बस स्थानकाजवळी बोगद्याजवळ दहा रुपयांची नोट देऊन त्याने राजविर याला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.
ग्रामस्थांनी लागलीच धाव घेत संशयित अपहरणकर्त्याच्या तावडीतून मुलाची सुटका केली. यावेळी ग्रामस्थांनी अपहरणकर्त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर ग्रामस्थानी त्याला गोंदी पोलीसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, संशयित ओडिशा येथील असून त्याचे नाव उनकू बाबाजी बसंतीया ( रा. खामोगा) असे आहे. तसेच तो वेडसर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.