निराधार अनुदानासाठी पैसे लाटणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 06:03 PM2020-09-23T18:03:20+5:302020-09-23T18:04:24+5:30

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी योजनेच्या लाभार्थ्यांकडून २४०० रूपये घेणाऱ्या तहसील कार्यालयातील खाजगी संगणक चालकाला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. ही कारवाई जालना येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आली.

Arrested for swindling money of grants | निराधार अनुदानासाठी पैसे लाटणारा जेरबंद

निराधार अनुदानासाठी पैसे लाटणारा जेरबंद

Next

जालना : संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी योजनेच्या लाभार्थ्यांकडून २४०० रूपये घेणाऱ्या तहसील कार्यालयातील खाजगी संगणक चालकाला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. ही कारवाई जालना येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बुधवार दि. २३ रोजी सकाळी करण्यात आली.

पवन दत्तात्रय राऊत (रा. साळगाव ता. परतूर. ह.मु.जालना) असे ताब्यात घेतलेल्या खाजगी संगणक चालकाचे नाव आहे. एका तक्रारदाराला संजय गांधी निराधार योजनेचे १२ हजार ४०० रूपये मंजूर झाले होते. मंजूर रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी तक्रारदाराने जालना तहसील कार्यालयातील खाजगी संगणक चालक पवन राऊत याच्याकडे पाठपुरावा केला. त्यावेळी राऊत याने ‘योजनेचे पैसे जमा करायचे असतील तर मला २४०० रूपये द्यावे लागतील. तुम्ही मला पैसे नाही दिले तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत.’, असे सांगितले. तक्रारदाराने यासंबंधीची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

त्यानुसार एसीबीने दि. १० सप्टेंबर रोजी तक्रारीची पडताळणी केली आणि बुधवारी सकाळी तहसील कार्यालयासमोर सापळा लावला. तक्रारदाराच्या कामासाठी पैशांची मागणी करून रक्कम स्विकारताच पथकाने राऊत विरोधात कारवाई केली.

प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक रवींद्र निकाळजे, कर्मचारी ज्ञानदेव झुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, आत्माराम डोईफोडे, ज्ञानेश्वर म्हस्के, शिवाजी जमधडे, सचिन राऊत, जावेद शेख, चालक आरेफ शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Arrested for swindling money of grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.