प्रेमसंबंध उघड झाले, 'व्हॅलेंटाईन डे' च्या दुसऱ्याच दिवशी तरुणास गल्लीतील चौघांनी संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 11:48 IST2025-02-17T11:45:55+5:302025-02-17T11:48:15+5:30
एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

प्रेमसंबंध उघड झाले, 'व्हॅलेंटाईन डे' च्या दुसऱ्याच दिवशी तरुणास गल्लीतील चौघांनी संपवले
अंबड : शहरात प्रेम संबंधातून तरुणाचा चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अंबड येथे न्यायालयासमोर हजर केले आहे. तीन आरोपी अद्याप फरार असून, पोलिस शोध घेत आहेत.
अंबड शहरातील पठाण मोहल्ला भागात राहणारा कलीम फेरोज पठाण या तरुणाचा प्रेम संबंधाच्या कारणावरून शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चाकूने वार करून खून करण्यात आला. सरफराज फेरोज शेख, फेरोज इस्माईल शेख, अवेस फेरोज शेख, नासेर इस्माईल शेख सर्व रा. पठाण मोहल्ला, अंबड या चौघांनी शनिवारी कलीम शेख याला धारदार चाकूने वार करून ठार केले. याप्रकरणी सलीम शेख खाजा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, रविवारी या गुन्ह्यातील एक आरोपी जालना येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अंबड पोलिसांच्या पथकाने जालना शहरातील संजीवनी हॉस्पिटल परिसरातून सरफराज फेरोज शेख यास ताब्यात घेतले. आरोपीस न्यायालायासमोर हजर केले असताना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, सहायक पोलिस निरीक्षक गुरले, उपनिरीक्षक नरोडे, विष्णू चव्हाण, दीपक पाटील, स्वप्निल भिसे, अरुण मुंढे, भानुसे यांनी केली.