जालन्यात आंबेडकरांचा जयघोष...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:36 IST2019-04-15T00:34:53+5:302019-04-15T00:36:10+5:30
भीमा सारखा माणूस खरा जन्मा येईल काय... सांगा माझ्या भीमरायावाणी कोणी पुढारी होईल का.. आदी एका पेक्षा एक सरस गाण्यांनी रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत उत्साह संचारला होता.

जालन्यात आंबेडकरांचा जयघोष...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : उध्दरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे.., कसा शोभून दिसतोय टाय अन् कोटावर.., सुज्ञानाचा निर्मळ झरा.. भीमा सारखा माणूस खरा जन्मा येईल काय... सांगा माझ्या भीमरायावाणी कोणी पुढारी होईल का.. आदी एका पेक्षा एक सरस गाण्यांनी रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत उत्साह संचारला होता.
रविवारी सकाळपासूनच मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आंबेडकरप्रेमी जनतेने मोठी गर्दी केली होती. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल तसेच शेख महेमूद, रमेश देहडकर, मधुकर घेवंदे, दिनकर घेवंदे, अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अॅड. बी.एम.साळवे, संजय खोतकर, सुधाकर निकाळजे, अॅड. शिवाजी आदमाने, पिंटू रत्नपारखे, सुनील साळवे, अरूण मगरे, राजेंद्र जाधव, राहुल रत्नपारखे, संदीप खरात, योगेश रत्नपारखे व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
सकाळी परिसरात निळे झेंडे आणि ढोलताशांनी परिसरात उत्साही वातावरण होते. अनेकांनी एकमेकांना भेटून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नवीन आणि जुना जालना भागातून युवकांनी सकाळपासूनच डीजेच्या तालावर भव्य मिरवणुका काढल्या होत्या. सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत युवकां प्रमाणेच महिला आणि युवतींचा लक्षणीय सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नालंदा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. सलग १८ तास अभ्यास करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याची माहिती भास्कर शिंदे यांनी दिली.
३० वाहनांचा सहभाग : देखाव्यांनी वेधले लक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मुख्य मिरवणुकीमध्ये ३० पेक्षा अधिक वाहनांचा सहभाग होता. तर शहराच्या विविध भागांतून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे सादर करण्यात आले होते.
शहरातील मुथा बिल्डिंग येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोठ्या पडद्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडून दाखविण्यात येत होता. याचेळी विशेष लेझर शो आणि आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून गेला होता. मिरवणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.
स्वयंसेवी संस्थांची मदत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना चौका-चौकामध्ये पिण्याचे थंड पाणी तसेच चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक युवकांनी आपल्या मोटार सायकलींना मोठमोठे निळे झेंडे लावून सकाळी मोटारसायकल रॅली काढली होती. मिरवणुकीत लेझीम पथक आणि अन्य सांस्कृतिक देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. वाहतुकीला अडचण येऊ नये म्हणून दुसऱ्या मार्गावर वाहतूक वळविली होती.